SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी‘डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींची नेदरलँडमधील सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत दैदिप्यमान कामगिरी’बालकामगार : कारणे, परिणाम आणि उपाययोजनाराष्ट्रसंत तुकडोजी महाराज: एक युगद्रष्टा समाजसुधारकअंबाबाई मंदिर परिसर विकास: २ मे पासून मालमत्तांचे प्राथमिक सर्वेक्षण; प्रशासनाचे सहकार्य करण्याचे आवाहनपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजनपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहणमहाराष्ट्र दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात महाडायलिसीस सेवांचा विस्तारजिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून शेंडा पार्क परिसराची पाहणीडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा चित्रे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

जाहिरात

 

बालकामगार : कारणे, परिणाम आणि उपाययोजना

schedule30 Apr 26 person by visibility 106 categoryराज्य

🔳प्रासंगिक लेख :  30 एप्रिल राष्ट्रीय बालकामगार  विरोधी दिन

बालपण हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात मुलांनी शिक्षण घ्यावे, खेळावे, नवे अनुभव घ्यावेत आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, अशी अपेक्षा असते. परंतु वास्तवात अनेक मुलांना या हक्कांपासून वंचित राहावे लागते आणि त्यांना लहान वयातच कामाच्या ओझ्याखाली जगावे लागते. हीच समस्या “बालकामगार” म्हणून ओळखली जाते आणि ती आजही समाजासाठी एक मोठे आव्हान आहे.

भारत हा तरुणांचा देश मानला जातो. परंतु अनेक वर्षांपासून बालकामगार ही एक गंभीर सामाजिक समस्या म्हणून आपल्यासमोर उभी आहे. आर्थिक अडचणी, शिक्षणाचा अभाव, कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक असमानता यांमुळे अनेक लहान मुले काम करण्यास भाग पडतात. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 लागू केला, जो बालकामगारांच्या संरक्षणासाठी एक महत्त्वपूर्ण कायदा ठरला. भारतात १४ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवण्यास कायद्याने बंदी (बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा) आहे. या कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, म्हणून भारतात 30 एप्रिल हा राष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.

🔲 बालकामगार म्हणजे काय?
बालकामगार म्हणजे १४ वर्षांखालील मुलांकडून कोणत्याही प्रकारचे श्रम करून घेणे. कायद्याने हे पूर्णपणे बंद आहे. तसेच १४ ते १८ वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास मनाई आहे. बालकामगार ही केवळ कायदेशीर समस्या नसून ती सामाजिक, आर्थिक आणि नैतिकदृष्ट्याही गंभीर बाब आहे.

🔲 बालकामगार होण्याची प्रमुख कारणे
1) गरिबी - गरिबी हे बालकामगाराचे सर्वात मोठे कारण आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी कामावर पाठवतात, जेणेकरून घरखर्चात हातभार लागेल.

2) अशिक्षितपणा- पालक शिक्षित नसल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजत नाही. त्यामुळे ते मुलांच्या भविष्यासाठी शिक्षणाऐवजी तात्पुरत्या उत्पन्नाला प्राधान्य देतात.

3) बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणा- घरातील मोठ्यांना रोजगार नसल्यामुळे किंवा कर्जाचा बोजा असल्यामुळे मुलांवर काम करण्याची जबाबदारी येते.

4) स्वस्त मजुरीची मागणी- काही उद्योग किंवा दुकानदार कमी खर्चात काम करून घेण्यासाठी मुलांना कामावर ठेवतात. मुलांकडून जास्त काम करून घेतले जाते आणि त्यांना कमी वेतन दिले जाते.

5) सामाजिक जागरूकतेचा अभाव- समाजात अजूनही बालकामगार ही चुकीची गोष्ट आहे याबाबत पुरेशी जागरूकता नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी ही समस्या कायम आहे.

🔲 बालकामगाराचे परिणाम
1) शैक्षणिक नुकसान- बालकामगार असलेल्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय होते.

2) आरोग्यावर परिणाम- लहान वयात कठोर श्रम केल्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. काहीवेळा त्यांना अपघात किंवा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.

3) मानसिक ताण आणि शोषण- कामाच्या ठिकाणी मुलांवर अन्याय, मारहाण किंवा मानसिक छळ होण्याची शक्यता असते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो.

4) गरिबीचे चक्र कायम राहणे- शिक्षण नसल्यामुळे मोठे झाल्यावरही त्यांना चांगल्या नोकऱ्या अथवा उत्पन्नाचे स्त्रोत मिळत नाहीत आणि ते पुन्हा गरिबीतच अडकून राहतात.

🔲 राष्ट्रीय बाल कामगार अधिनियम, 1986- बालहक्क संरक्षणाची दिशा

या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे बालकांना धोकादायक व हानिकारक कामांपासून दूर ठेवणे आणि त्यांच्या कामाच्या अटींवर नियंत्रण ठेवणे. या कायद्यानुसार 14 वर्षांखालील मुलांना “बालक” म्हणून ओळखले जाते. सुरुवातीला या कायद्यात काही विशिष्ट उद्योगांमध्येच बालकामगारांना बंदी घालण्यात आली होती, जसे की खाणकाम, कारखाने आणि स्फोटक पदार्थांशी संबंधित कामे. या उद्योगांमध्ये काम करणे मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्यामुळे त्यावर कडक बंदी घालण्यात आली.

ज्या क्षेत्रांमध्ये बालकामगारांना परवानगी होती, त्या ठिकाणी त्यांच्या कामाच्या वेळांवर आणि परिस्थितींवर मर्यादा घालण्यात आल्या. उदाहरणार्थ, मुलांना दिवसाला सहा तासांपेक्षा जास्त काम करता येत नाही, सलग तीन तासांनंतर विश्रांती देणे बंधनकारक आहे आणि रात्रीच्या वेळी काम करण्यास मनाई आहे. या तरतुदी मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.

काळानुरूप या कायद्यात सुधारणा करण्यात आली. विशेषतः 2016 मध्ये झालेल्या बदलांमुळे हा कायदा अधिक कठोर आणि प्रभावी बनला. या सुधारणेनुसार 14 वर्षांखालील मुलांना कोणत्याही व्यवसायात काम करण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे (फक्त कुटुंबीय व्यवसायात मर्यादित स्वरूपात मदत करण्यास परवानगी आहे). तसेच 14 ते 18 वयोगटातील मुलांना “किशोर” म्हणून ओळख देऊन त्यांना धोकादायक उद्योगांमध्ये काम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडाची तरतूद करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास तुरुंगवास किंवा आर्थिक दंड, किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. त्यामुळे बालकामगारांना रोजगार देणाऱ्यांवर कायद्याची भीती निर्माण होते आणि बालश्रम रोखण्यास मदत होते                 

🔲 महाराष्ट्र शासनाची भूमिका-

महाराष्ट्राचे गतिशिल मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे कामगार मंत्री ॲङ  आकाश फुंडकर हे बालकामगार निर्मूलनासाठी सक्रिय भूमिका बजावत आहेत. त्यासाठी शासन स्तरावरुतन अनेक योजनांची अंमलबाजावणी केली जात आहे. बालकामगार समस्या ही केवळ कायद्याने संपणार नाही, तर त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासन विविध योजना व कडक अंमलबजावणीद्वारे या समस्येवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहे.

१. कायद्याची कडक अंमलबजावणी: राज्यातील औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल्स, बांधकाम साईट्स, कारखाने येथे जिल्हास्तरावरुन नियमित तपासण्या करून बालकामगार आढळल्यास कारवाई केली जाते.

२. जनजागृती मोहीम: शासन विविध माध्यमांतून बालकामगार विरोधी संदेश देऊन लोकांमध्ये जागृती निर्माण करते. शाळा, ग्रामपंचायत व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रचार केला जातो.

३. शिक्षणावर भर: मुलांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी मोफत शिक्षण, शालेय साहित्य, मध्यान्ह भोजन योजना यांचा प्रभावी वापर केला जातो. यामुळे बालकामगार होण्याची शक्यता कमी होते.

४. समन्वय यंत्रणा: राज्य शासनाचा कामगार विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्यात समन्वय ठेवून कारवाई केली जाते.

🔲 उपाययोजना
महाराष्ट्र शासनाने बालकामगार समस्या दूर करण्यासाठी अनेक ठोस उपाययोजना राबवल्या आहेत:

१. बचाव व पुनर्वसन (Rescue & Rehabilitation): बालकामगार आढळल्यास त्यांची सुटका करून त्यांना शासकीय बालगृह किंवा पुनर्वसन केंद्रात ठेवले जाते. त्यांना शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण दिले जाते.

२. आर्थिक सहाय्य: गरिब कुटुंबांना आर्थिक मदत देऊन मुलांना कामावर पाठविण्याऐवजी शाळेत पाठवण्यास प्रोत्साहन दिले जाते.

३. राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प (NCLP): या योजनेअंतर्गत बालकामगार मुलांसाठी विशेष शाळा चालवल्या जातात, जिथे त्यांना शिक्षण, पोषण आणि आरोग्य सुविधा दिल्या जातात.

४. बालहक्क संरक्षण संस्था: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग ही संस्था मुलांच्या हक्कांचे संरक्षण करते आणि तक्रारींवर कार्यवाही करते.

            “आजचा बालक हा उद्याचा नागरिक आहे” हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी बालकामगार निर्मूलनासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सरकार, समाज आणि प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन ही समस्या दूर केली, तरच आपला देश खऱ्या अर्थाने प्रगत आणि सशक्त बनेल.

✍️ रणजित पवार
उपसंपादक, विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes