कोल्हापुरात हायप्रोफाईल ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश: व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे चालायचा काळा धंदा; करवीर पोलिसांची धडक कारवाई!
schedule12 Jul 26 person by visibility 290 categoryगुन्हे
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्याला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. करवीर तालुक्यातील वाशी येथील ‘सनराईज लॉजिंग’मध्ये व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा करवीर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे पांढरपेशा वेशात वावरणाऱ्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुख्य सूत्रधार शहाजी एकनाथ वैद्य (उर्फ सागर पाटील) याने ‘सागर पाटील फ्रेंड सर्कल’ नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून पुणे आणि मुंबई येथून महिलांना बोलावून, त्यांचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना भुरळ घातली जात असे. ग्राहकांकडून कॅश किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारून हा हायप्रोफाईल कुंटणखाना चालवला जात होता.
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीवरून, करवीर पोलिसांनी सापळा रचला आणि ११ जुलै २०२६ रोजी ‘बोगस ग्राहक’ पाठवून या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत एक पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून सागर प्रभाकर कांबळे आणि कमलेश कृष्णा पाटील या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारवाईत ६,९०० रुपयांची रोकड, ४ मोबाईल हँडसेट, ७२ निरोध पाकिटे असलेला बॉक्स आणि इतर साहित्य, लॉजचे रजिस्टर व भाडे करार जप्त करण्यात आले आहे.
मुख्य सूत्रधार शहाजी वैद्य आणि त्याचे साथीदार सुहास निचीते, विक्रम दिनकर कांबळे हे घटनास्थळी मिळून आले नाहीत. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुहास पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून, फरार आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या पथकाने केली आहे. कोल्हापुरातील अवैध धंद्यांवर करवीर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.