इचलकरंजीच्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे, उपमहापौरपदी अँड. अनिल डाळ्या बिनविरोध
schedule09 Feb 26 person by visibility 142 categoryमहानगरपालिका
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंद धातुंडे तर उपमहापौरपदी अँड. अनिल देवकरण डाळ्या यांची सोमवारी बिनविरोध झाली. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंद व्यक्त केला.
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा महायुतीने 47 जागा जिंकत सत्ता मिळवली होती. त्यामुळे भाजपकडे निर्विवाद बहुमत असल्याने महापौर, उपमहापौर ही दोन्ही पदे याच पक्षाकडे येणार हे स्पष्ट झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या वतीने भाजपकडून उदय धातुंडे व उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापूर्वी 5 फेब्रुवारी रोजी शिवशाहू विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण व उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज भरले होते.
अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सभेचे कामकाज सुरू झाले. सभेच्या सुरवातीलाच विरोधी गटाचे सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सात दिवसाचा कालावधी अपेक्षित असताना तो दोन दिवसाच्या दिल्याचा आक्षेप घेत हरकत दाखल करत महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली. याबाबतचे वैधानिक स्पष्टीकरण पिठासीन अधिकारी शिंदे यांनी करत आक्षेप फेटाळून लावला. त्यानंतर महापौर निवडीला सुरुवात झाली.
यावेळी सयाजी चव्हाण यांनी आपला महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे पिठासीन अधिकारी शिंदे यांनी यांनी उदय धातुंडे यांची महापौरपदी निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीवेळी संगीता आलासे यांनीही माघार घेतली. त्यामुळे डाळ्या यांचीही बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर संजय शिंदे, पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर धातुंडे व उपमहापौर डाळ्या यांचा सत्कार केला.