५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीसाठी बँक युनियनची आज देशभरात निदर्शने; संपाचाही दिला इशारा
schedule12 Aug 26 person by visibility 138 categoryदेश
कोल्हापूर : ५ दिवसांच्या बँकिंगच्या प्रलंबित मागणीवर शासनाकडून होत असलेल्या विलंबाचा निषेध करण्यासाठी 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) च्या वतीने आज (१२ ऑगस्ट २०२६) सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर देशातील सर्व राज्यांच्या राजधान्या आणि महत्त्वाच्या केंद्रांवर संयुक्त निदर्शने करण्यात आली. दरम्यान कोल्हापूरमध्ये ही निर्दशने करण्यात आली.
'इंडियन बँक असोसिएशन' (IBA) सोबत झालेल्या सामंजस्य करारात (MoU) आणि संयुक्त टिपणीमध्ये ५ दिवसांच्या बँकिंगच्या मागणीला मान्यता देण्यात आली होती, तसेच हा प्रस्ताव शिफारसीसह सरकारकडे पाठवण्यात आला होता. मात्र, यावर कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. नोव्हेंबर २०२७ मधील वेतन संशोधनाची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले असले, तरी ५ दिवसांच्या बँकिंगच्या महत्त्वाच्या मुद्यावर पूर्णपणे मौन बाळगले जात असल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
आजच्या यशस्वी निदर्शनांनंतर आता युनियनतर्फे लवकरच बैठक घेतली जाणार असून, यामध्ये संपाच्या कारवाईसह पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.