संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात ‘प्रारंभ २०२५’ उत्साहात
schedule06 Aug 25 person by visibility 267 categoryशैक्षणिक

▪️उच्च ध्येयासाठी धैर्य, आत्मविश्वास व परिश्रम आवश्यक – विश्वस्त विनायक भोसले यांचा संदेश
कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतीग्रे येथील पॉलिटेक्निक विभागात डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रारंभ २०२५’ हा प्रेरणादायी उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.
यावेळी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील, कार्यक्रम समन्वयक व्ही. व्ही. जाखलेकर, प्रा. डी. ए. सनदे, इन्स्टिट्यूटमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी धैर्य, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण परिश्रम आवश्यक आहेत. यशासाठी केवळ बुद्धिमत्ता नव्हे, तर चिकाटी व कष्टाची तयारी असावी लागते.” त्यांनी संजय घोडावत शैक्षणिक संकुलात चालणाऱ्या केजी ते पीजी स्तरावरील उत्कृष्ट शिक्षण प्रणालीची माहिती देत २१,००० हून अधिक विद्यार्थी या शैक्षणिक कुटुंबाचा भाग असल्याचा उल्लेख केला. “विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम करणारे कौशल्यही आम्ही देतो,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील यांनी पालक व विद्यार्थ्यांचे स्वागत करून संस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.
इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी आपल्या मनोगतातून पालकांना विश्वास दिला की, “विद्यार्थ्यांनी निवडलेले करिअर यशस्वी करण्यासाठी संपूर्ण टीम कटिबद्ध आहे.” त्यांनी नवीन अभ्यासक्रम, विविध शाखा आणि उपलब्ध सुविधांबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर यांनी केले तर प्रा. व्ही. व्ही. जाखलेकर यांनी आभार प्रदर्शन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी ‘प्रारंभ २०२५’ कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.