महाराष्ट्राचे लाडके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व: आचार्य प्रल्हाद केशव अत्रे
schedule13 Aug 24 person by visibility 542 categoryसामाजिक

१३ ऑगस्ट: आचार्य प्र.के.अत्रे यांचा १२५ वा जन्मदिन, त्यानिमित्ताने डॉ. सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर. यांचा विशेष लेख...
थोर साहित्यिक, महान नाटककार, लेखक, आत्मचरित्रकार संवेदनशील कवी, कल्पक विडंबनकार , विद्यार्थीप्रिय शिक्षक, व्यासंगी प्राध्यापक, मानवतावादी शिक्षणतज्ज्ञ, हजरजबाबी विनोदाचे बादशहा, महाराष्ट्राचे महान हास्यसम्राट, वृत्तपत्र सृष्टीतील भिष्माचार्य, सव्यसायी पत्रकार, साक्षेपी संपादक, राष्ट्रपती पारितोषिक विजेते चित्रपट निर्माते, कलासक्त दिग्दर्शक, हजारों श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे व सभा गाजवणारे फर्डे वक्ते, अत्यंत हजरजबाबी, स्पष्टवक्तेपणा, समयसूचकता व मराठी माणूस आणि मराठी भाषा संस्कृती वर अफाट प्रेम करणारे आमदार, लोकमनाची नाडी अचूक ओळखणारे राजकीय नेते, निसर्ग उपासक, प्रचंड जनसंपर्क असलेले फटकळ पण तितकेच प्रेम करणारे सच्चा मित्र, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देणारे सेनानी अशा अनेक अंगाने अष्टपैलूत्व सिध्द केलेले जबरदस्त व विचाराची उंची गाठलेले महाराष्ट्राचे लाडके महान अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे तथा प्र.के.अत्रे होत.
मराठी सारस्वतांच्या दरबारातील ते अध्वर्यू मानकरी ठरले होते. मराठी वाड:मयातील सर्व साहित्य प्रकार त्यांनी लिलया हाताळले. त्यांनी आपल्या स्पर्शाने मराठी साहित्याचे अक्षरशः सोने केले. आचार्य अत्रे म्हणजे एक अनभिज्ञ साहित्यसम्राट होत. आचार्य अत्रे यांची साहित्य संपदा पाहिली की, ते मराठी सारस्वतांला पडलेले एक सुंदर स्वप्न होते, असे म्हणावेसे वाटते, नव्हे नव्हे आचार्य अत्रे म्हणजे मराठी भाषा व संस्कृतीतील एक चमत्कार म्हणावा लागेल.
पुणे जिल्ह्यातील कऱ्हा नदीच्या काठावरचे सासवड ही आचार्य अत्रे यांची जन्मभूमी. कैवल्य सम्राट संत ज्ञानोबा माऊलींचे कनिष्ठ बंधू संत सोपानदेव यांचे समाधीस्थळ सासवड मध्ये असल्याने ही भूमी पवित्र पावन झालेली आहे. या रम्य व पवित्र भूमीत त्यांचा जन्म झाला.
"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे," "येणे सुखे रुचे एकांताचा वास..." या संतोक्तीप्रमाणे त्यांना उपजतच सृष्टी सौंदर्यांची ओढ होती. निसर्गरम्य वातावरणात ते मनस्वी रमत असत. त्यामुळेच त्यांनी आपल्या साहित्याच्या निर्मितीसाठी प्रमुख स्थान म्हणून खंडाळा येथील 'राजमाची' ही टुमदार हवेली निवडली होती. खंडाळ्याच्या निसर्गाच्या सान्निध्यात ते हे माणसांचे जग विसरत. खंडाळ्याच्या 'राजमाची'त त्यांनी त्यांच्या अनेक अजरामर साहित्यकृतींची निर्मिती केली. मानवापेक्षा निसर्ग श्रेष्ठ आहे, अशी त्यांची मनोधारणा होती. साहित्यिक, कवी, संपादक, कलावंत अशा लोकांच्या मध्ये ते रमत असत. त्यांना कलावंतांचा सहवास भावत असे. जिथे जिथे चांगलं व मंगल असे, जे जे उदात्त व उन्नत असेल, तिथे तिथे ते आवर्जून जात असत. हातचं राखून न ठेवता त्यांचा ते मुक्त कंठाने व सिद्धहस्त लेखणीतून गौरव करीत असत, त्यांनी नामदार बाळासाहेब देसाई यांना ' लोकनेते ' , कोल्हापूरच्या शिवाजी उद्यमनगर येथील म्हादबा मेस्त्री यांना ' यंत्रमहर्षी ' यांसारख्या दिलेल्या कित्येक उपाध्या आजही भूषणावह होऊन राहिल्या आहेत.
जीवनातील प्रत्येक घटनांकडे ते आनंदाने व शुध्द भावनेने पहात असत. जगातील दुःखाकडे देखील ते सकारात्मक विचारांने व आनंदाने पहात असत.त्यांच्या या नैसर्गिक शुध्द भावनेमुळे ते सदैव आनंदी जीवन जगले. लहान बालक निरागसपणे रमत गमत चालत शाळेत जाते, तसे ते आयुष्यभर रमत गमत कुठल्याही परिस्थितीला हसतमुखाने सामोरे गेले, लक्ष्मी, सरस्वती आणि किर्ती यांचा त्रिवेणी संगम त्यांच्या ठिकाणी होता. लोकांची सामाजिक आकांक्षा जागृत करण्यासाठी त्यांनी आपल्या लेखणीचा प्रभावीपणे वापर केला. पुरेसे आर्थिक पाठबळ नसताना ही त्यांनी साप्ताहिक नवयुग, सांयदैनिक जयहिंद व दैनिक मराठा ही वृत्तपत्रे चालविली. मात्र त्यांच्या पत्रकारितेच्या वाटचालीत जनता- जनार्दनाचा उत्स्फूर्त व खंबीरपणे पाठींबा मिळाला होता. त्या काळात एखादे वृत्तपत्र सुरू करणे म्हणजे तारेवरची कसरत किंवा पेटत्या चुलीवर हात भाजून घेऊन भाकरी करण्यासारखे होते, मात्र आचार्य अत्रे यांनी ध्येय, ध्येर्य, निष्ठा, चिकाटी, व हेतू शुद्धता शिवाय निर्भीड व निरपेक्ष वृत्तीने समाज परिवर्तन व समाज प्रबोधनाचे व्रत स्विकारून अवघ्या वृत्तपत्र सृष्टीला कळस चढवला. ते आपले विचार स्पष्टपणे, सरळ आणि साध्या सोप्या भाषेत मांडत. त्यांच्या लेखणीत जबरदस्त सामर्थ्य होते. त्यांचे लेख वाचकांच्या हृदयाचा ठाव घेत असत. सर्वसामान्य जनतेच्या अंतःकरणाला स्पर्श करीत. त्यांचे अग्रलेख त्यांच्या विद्वत्तेचा साक्षात्कार करून देत. त्यांच्या अग्रलेखात ढोंगीपणा बद्दल तीव्र संताप, अन्याय अत्याचार यांबाबत चीड, प्रसंगी अपार करूणा, श्रध्दा, विनोद, विडंबन, प्रसहन यांचे दर्शन घडायचे. त्यात ही त्यांच्या मनाचा दिलदारपणा, प्रांजळपणा व मोकळेपणा दिसायचा. दैनिक मराठा मधील त्यांच्या काही अग्रलेखाचे संकलन करून पुस्तक रूपाने ते प्रसिध्द झाले आहेत. पूज्य साने गुरुजींच्या देहांतानंतर लिहिलेल्या "मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी", महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर लिहिलेल्या "महात्मा गांधी अमर हो गये", मास्टर विनायक यांच्या मृत्यूनंतर लिहिलेल्या "बाल मनोवृत्तीचा माझा मित्र", पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर सलग बारा दिवस "सुर्यास्त" या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून त्यांनी वाचकांना अंतर्मुख आणि अस्वस्थ करून सोडले. त्यांनी आयुष्यात अनवधानाने किंवा अपरिहार्यपणे काही चुका केल्या असतील, त्याची त्यांनी जाहिर कबुली दिली, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा क्वचितच दुसऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी पहायला मिळतो, असे असलेतरी त्यांनी वशिल्याने, पैशासाठी, वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी, किंवा केवळ मत्सर व सुडापोटी आपल्या लेखणीचा दुरुपयोग संपूर्ण आयुष्यात कधीही केला नाही.
"आपणास जे जे ठावे, ते ते लिहावे,| शहाणे करून सोडावे सकळ जन||" या उक्तीप्रमाणे ते लिहीत होते, अर्थात"जीवनासाठी ज्ञान" हा दृष्टिकोन ठेवून त्यांनी आयुष्यभर आपली लेखणी अक्षरशः चंदनाप्रमाणे झिजविली.
मराठी पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे योगदान मौलिक आहे.ते एक यशस्वी नाटककार ठरले आहेत. स्त्रियांविषयी त्यांना कमालीचा कळवळा व आत्मियता होती. स्त्री समस्येवर सामाजिक जाणीवेतून त्यांनी अनेक नाटके लिहिली."घराबाहेर", "उद्याचा संसार", "जग काय म्हणेल?", या नाटकाद्वारे त्यांनी स्त्रियांचे दुःख, त्यांच्या समस्या, याबाबत वास्तव आणि सत्य असे लिखाण केले, स्त्रिसमस्येसंबधीची ही त्यांची नाटके हृदयस्पर्शी अशी होती.
" तो मी नव्हेच", "मी उभा आहे", "मोरुची मावशी", "साष्टांग नमस्कार", "लग्नाची बेडी", ही त्यांची नाटके तुफान गाजली. रंगभूमीचे सर्वार्थाने यथार्थ दर्शन त्यांनी त्यातून महाराष्ट्राला घडवले.
आचार्य अत्रे हे एक यशस्वी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक होते. त्यांनी निर्मिलेल्या पूज्य साने गुरुजी यांच्या जीवनावरील "श्यामची आई" या चित्रपटास १९५३ साली पहिले सुवर्णपदक मिळाले आणि मराठी मनाला अश्रूंचे मोल काय असते, याचा बोध झाला. अश्रुंचे महन्मंगल तत्वज्ञान त्यांनी मराठी रसिकांच्या हृदयात उतरवले. तमाम प्रेक्षकांच्या डोळ्यांतून अश्रूधारा काढणारा "श्यामची आई" चित्रपट अविस्मरणीय ठरला आहे. त्यानंतर कर्ते समाजसुधारक व स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनकार्यावर १९५४ साली काढलेल्या "महात्मा फुले" या चित्रपटाला ही मराठीतील सर्वोत्कृष्ट फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता , तसेच राष्ट्रपती पारितोषिक मिळवले होते.
आचार्य अत्रे विनोद सम्राट होते. त्यांनी तमाम महाराष्ट्राला भरभरून हसायला शिकवलं. तसं रडायला ही शिकवलं, त्यांची वाड्मय निर्मिती म्हणजे एका डोळ्यात हासू तर दुसऱ्या डोळ्यात आसू. ते महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात स्वकर्तृत्वाने अजरामर झाले आहेत. पत्रकारिता, साहित्य , नाटक, व चित्रपट या क्षेत्रात त्यांनी एक न भुतो असा इतिहास घडविला आहे.
समयसूचकता, स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबी, उत्स्फूर्तपणे विनोद निर्मिती, अचूकवेळी मार्मिकपणे चपखल विनोद ही त्यांची खासियत होती. साध्या सोप्या भाषेत केलेले विनोद श्रोत्यांना मनस्वी भावत. महाराष्ट्रातील रसिक जनतेला दहापंधरा मिनिटे नाॅनस्टाॅप हसायला शिकवलं ते आचार्य अत्रे यांनी. हास्याचा गडगडाट म्हणजे काय किंवा हास्याचा धबधबा म्हणजे काय, याचा प्रत्यय आचार्य अत्रे यांनी महाराष्ट्रातील जनतेला करुन दिला. आचार्य अत्रे यांची वाणी आणि लेखणी म्हणजे प्रचंड हशा आणि टाळ्या असं जणू समीकरणच झाले होते.
त्या काळात नाटककार मामा वरेरकर आणि आचार्य अत्रे यांच्यात वारंवार वाड्मयीन संघर्ष होत होता. एका सभेत आचार्य अत्रे म्हणाले, " महाराष्ट्रातला मोठा विद्वान नाटककार म्हणजे मामा वरेरकर."... प्रचंड टाळ्या. नंतर लगेच ते म्हणाले, "असे त्यांचे (मामा वरेरकर यांचे) स्वतःचे मत आहे." सभेत टाळ्याच टाळ्या.
एकदा एका कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे प्रमुख वक्ते होते, आसन व्यवस्थेत खालच्या मजल्यावर पुरुष व वरच्या मजल्यावर महिलांसाठी बसण्याची आसन व्यवस्था होती. आचार्य अत्रे भाषणासाठी उभे राहिले, व चौफेर नजर टाकून म्हणाले, (गॅलरीत महिलांकडे पाहून)"स्वर्गातील अप्सरांनो..." आणि (खालच्या मजल्यावर बसलेल्या पुरुषांकडे पाहून) " पृथ्वीवरील मानवांनो...!" पाचदहा मिनिटे नुसता हशाच हशा आणि प्रचंड टाळ्या.
आचार्य अत्रे यांचे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये व्याख्यान होते, "सभ्य स्त्री पुरुष हो.." अशी त्यांनी सुरुवात करताच दुसऱ्या मजल्यावरील एका विद्यार्थ्याने "ओ.." असे उत्तर दिले, सभागृहात एकदम हशा पिकला, पण शांतपणे आचार्य अत्रे त्या विद्यार्थ्याला पाहून म्हणाले,"आपल्याला नाही, मी सभ्य स्त्री पुरुषांना उद्देशून म्हणालो". सभागृहात एकदम हशाच हशा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
आचार्य अत्रे मुंबई येथील न्यू हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरीस लागले. पहिल्याच दिवशी त्यांना विद्यार्थ्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी सिंहाच्या गर्जना सारख्या आवाज काढला, त्यांची तोंडे मिटलेली होती, पण नाकातून आवाज काढत होती. अत्रे शांतपणे म्हणाले, " गुड मॉर्निंग लायन्स!", पुढे ते म्हणाले की,मी संस्कृतचा मास्तर आहेच, शिवाय सर्कशीत रिंगमास्टरचेही काम कलेले आहे, तेव्हा परत जर सिंह ओरडायला लागले तर एकेकांची शेपटी धरून पिंजऱ्यात कोंबीन...!. तेव्हा सिंह जागच्या जागी शांत झाले.
आचार्य अत्रे यांचे दैनिक मराठा वृत्तपत्र वाचकप्रिय झाले होते, सकाळी सकाळी दैनिक मराठा वर वाचकांच्या अक्षरशः उड्या पडत असत. कित्येक वेळा तिप्पट चौपट किंमत देऊन वाचकांना दैनिक मराठा घ्यावा लागे. एकदा काही वाचकांनी अत्रे यांची भेट घेतली व विक्रेत्यांबद्दल वस्तुस्थिती सांगितली, तेव्हा आचार्य अत्रे शांतपणे म्हणाले, "गवळी दुधात पाणी घालतो, म्हणून म्हशीकडेच तक्रार करावी काय?". साऱ्यांनाच हसू आलं आणि ते निरुत्तर झाले.
एका निवडणुकीच्या सभेत आचार्य अत्रे बोलण्यास उभे राहिले, शर्टाची वरील दोन बटणे घातली नव्हती, त्यामुळे माईक मागेपुढे करतांना त्यांच्या गळ्यातील जानवे अडकले, तेव्हा आचार्य अत्रे चटकन म्हणाले," जिथं जाईल तिथं हे जानवं आड येतं बघा..!".
विनोद म्हणजे एक कला आहे. विनोद हा केंव्हाही कोठेही निर्माण होत नाही. त्यासाठी परस्परांत खेळकरपणा व मोकळे, प्रसन्न वातावरण असावे लागते. विनोद बुद्धी असणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण समजले जाते. तसेच विनोद कळणे हे देखील सुशिक्षितपणाचे लक्षण मानले जाते. "टवाळा आवडे विनोद" हे एक वचन आहे. विनोदाला तुच्छ समजणे अयोग्य आहे. सर्वांना क्षणभर का होईना सुख देणारा, निरागस विनोद असावा, टोमणा नसावा. जीवनाकडे विनोदी व खेळकर वृत्तीने पाहिले की, मानवी जीवन सुखावह होते.
पुण्यात एका तमाशा थिएटरच्या उद्घाटनासाठी आचार्य अत्रे यांना निमंत्रित केले होते, त्यांचे भाषण ऐकण्यासाठी पुण्यातील पांढरपेशा लोकांनी गर्दी केली होती, तेव्हा या तमाशा पहायला आलेल्या श्रोत्यांकडे पाहून आचार्य अत्रे म्हणाले,"पुण्यातील सभ्य गृहस्थ हो..!". पाच मिनिटे हास्याचा कल्लोळ माजला.
एकदा आचार्य अत्रे नेहमी प्रमाणे मित्रांच्या समवेत पर्वती वर फिरायला गेले होते, तेव्हा गप्पांच्या ओघात एक पैज ठरली. "संपूर्ण पर्वती भराभर चढून पुन्हा लौकरात लवकर खाली यायचे."
तेव्हा एक शेळकाटा अशक्त मित्र म्हणाला," त्यात काय मोठंसं, सुबानुराव, मी एकटाच काय, तुम्हाला सुध्दा खांद्यावर घेऊन पर्वती चढेन, बोला काय देता?".
अत्रे चटकन म्हणाले, "तुमच्या प्रेतयात्रेचा खर्च." सारेच मनसोक्तपणे हसण्यात डुंबले.
आचार्य अत्रे यांच्या बाबतीत काहींचा आक्षेप होता की, ते फार अतिशयोक्तीचे बोलतात. त्याबाबत अत्रे म्हणत की, मराठी भाषा ही अतिशयोक्ती वरच आधारलेली आहे. ती एक बोलण्याची तऱ्हा आहे. नुसत्या शब्दांच्या फरकाने विनोद निर्मिती होते. हसणं आणि हसवणं ही खरी विनोदाची गंमत आहे, दीर्घ निरोगी राहण्यासाठी विनोद आवश्यक आहे. पण केवळ शाब्दिक खेळ म्हणजे विनोद नव्हे. विनोदामुळे वातावरणात मोकळेपणा येतो.
एकदा पुण्याला एका गणेशोत्सव मंडळाने आचार्य अत्रे यांचे व्याख्यान ठेवले होते, अध्यक्षस्थानी होते बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ. बॅरिस्टर गाडगीळ म्हणाले," अत्रे फार विनोदी आहेत,पण ते नेहमी अतिशयोक्तीपूर्ण बोलतात."
अत्रे उठले व व्याख्यानाला सुरवातीला म्हणाले, "माझे मित्र काकासाहेब गाडगीळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव विठ्ठलराव गाडगीळ..." ते थांबले व म्हणाले,"ही अतिशयोक्ती नाही ना?", सभेत प्रचंड हशा पिकला.
आचार्य अत्रे शब्दांच्या कोट्या करण्यात मशहूर होते. नामदार स.का. पाटील यांचा "नासका पाटील", तुळशीदास जाधव यांचा "सुतळीदास जाधव", नामदार गोखले यांचा "नादार गोखले" अशा अनेक कोट्या करून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सभा गाजवल्या होत्या.
आचार्य अत्रे नाटककार राम गणेश गडकरी यांना गुरुस्थानी मानत. गडकरी यांच्या विषयी ते म्हणत की, गडकरी म्हणजे विनोदाची मूर्ती. त्यांच्यामुळे मी विनोद शिकलो.
एकदा एका सत्कार समारंभाच्या सभेत आचार्य अत्रे यांनी एक गोष्ट सांगितली. एकदा गडकरी व अत्रे बसले होते, एक गृहस्थ आला आणि तो गडकऱ्यांबरोबर भांडायला लागला. अखेर ते भांडण विकोपाला गेले. आणि गडकऱ्यांना म्हणाला, " तुमच्या सारख्या मूर्ख माणसाशी यापुढे मी कधीच बोलणार नाही."
गडकरी म्हणाले," तशी प्रतिज्ञा मी अजून काही केलेली नाही, मी तुमच्याशी बोलायला तयार आहे.." प्रचंड हशा.
अचानक, अपेक्षाभंगातून विनोद कसा होतो, याचा एक किस्सा आचार्य अत्रे यांनी एकदा श्रोत्यांना सांगितला, तो असा...
गडकऱ्यांचा भाऊ एका सकाळी सकाळी त्यांना सांगू लागला, "मी रात्री झोपलो होतो, सकाळी उठून पाहतो तो एक भला मोठा विंचू माझ्या उशीखाली होता.." गडकऱ्यांनी आश्चर्य वाटल्याचे न दाखवता शांतपणे भावाला म्हणाले,"बरोबर आहे, दगडाखाली विंचू सापडणारच...!"
श्रोत्यांना हसता हसता पुरेवाट झाली.
इंग्लंड, अमेरिका....या सारख्या देशात विनोदाला लोकजीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अब्राहम लिंकन, बर्नार्ड शाॅ, चर्चिल हे सर्व विनोदकार होते. आचार्य अत्रे म्हणाले होते की, इंग्रजी वाड:मयाने आपल्या जीवनात एक फार मोठी देणगी दिली आहे. विनोद हा वक्ता, श्रोता, लेखक, वाचक यांच्यावर बराचसा अवलंबून आहे.
एखादा शब्द, परिणामकारक गोष्ट, केंव्हा कशी सांगायची हे एक शास्त्र आहे. हे शास्त्र आचार्य अत्रे यांनी काही प्रसंगानुरूप आत्मसात केले होते. आचार्य अत्रे आणि विनोद हे एक महत्वपूर्ण समीकरण होते.त्यामुळेच आचार्य अत्रे यांना संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
आचार्य अत्रे विनोदाबद्दल म्हणतात.... चर्चिल हे सर्वात मोठे विनोदी लेखक होते. आचार्य अत्रे त्यांना ही गुरुस्थानी मानत असत. एकदा बर्नार्ड शॉ या थोर नाटककाराने चर्चिलना नाटकाला येण्याबद्दल चिठ्ठी पाठवली, उद्या माझ्या पहिल्या नाटकाचा प्रयोग आहे, दोन पास पाठवत आहे, एक तुम्हाला आणि दुसरा तुमच्या मित्रांसाठी (जर मित्र असेल तर)...! तेव्हा चर्चिल यांनी उत्तर पाठविले..."उद्या मी फार गडबडीत आहे, तेव्हा दोन पास परवा दिवशी पाठवा, जर तुमच्या नाटकाचा प्रयोग पुन्हा होणार असेल तर...!".
नाटकासंबंधी विनोद सांगतांना आचार्य अत्रे यांनी एक किस्सा सांगितला, एका नाटक कंपनीत एक नट असाच गात होता, तेंव्हा प्रेक्षकांतून सारखे जोडे येत होते, त्यामुळे विंगेतून त्याला हळुच सांगितले की, " अरे संपव, लवकर संपव गाणं..", तर तो नट म्हणाला," डाव्या पायाचे जोडे आलेत हो, पण उजव्या पायाचे जोडे आलेले नाहीत..!". प्रचंड हशा पिकला.
आचार्य अत्रे पुणे जिल्ह्यातील सासवड येथे जन्मले. ते पुण्याला आई तर मुंबईला मावशी असे समजत.जेथे सुशिक्षित, समंजस, सुसंस्कृत माणसं किंवा समाज असतो, तेथे विनोद विकसित होतो. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत पुरोगामी राज्यात विनोद दृष्टी उपजतच होती.म्हणून महाराष्ट्रातील आचार्य अत्रे यांच्यासह कोल्हटकर, गडकरी, पु.ल.देशपांडे यांना महाराष्ट्रातील जनतेकडून मानसन्मान, प्रतिष्ठा व भरभरून प्रेम मिळाले. आचार्य अत्रे यांच्यामुळे महाराष्ट्रात विनोदाला प्रतिष्ठा व लोकप्रियता विलक्षण वाढली.
आचार्य अत्रे यांच्या भाषणात विनोदाचे अधिष्ठान असायचे. विनोदाचे मर्म आणि तत्व सर्वसामान्यांना समजावून देणारे त्यांचे विनोद असायचे. जगातील समस्त दुःखाकडे, समस्यांकडे, आणि अडचणींकडे खिलाडू वृत्तीने पाहणे याचे नाव विनोद असा विनोदाचा मतितार्थ आचार्य अत्रे सांगत असत. आचार्य अत्रे यांच्यासारखा वक्ता, लेखक, कवी,विडंबनकार,शिक्षक, प्राध्यापक,चित्रपट निर्माते दिग्दर्शक, नाटककार, समिक्षक, राजकीय सामाजिक नेता, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी व झुंजार नेता अशा विविधांगी भूमिका लाभलेल्या अष्टपैलू व्यक्तीमत्व पुढील दहा हजार वर्षांत होणे नाही.
✍️ डॉ.सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
( लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत)