कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : विजेचा शॉक देऊन 11 वर्षाच्या मुलाचा खून; पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात
schedule18 Jun 25 person by visibility 247 categoryगुन्हे

हातकणंगले : मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या फैजान नाजीम (वय 11) या परप्रांतीय अल्पवयीन मुलाचा 14 वर्षीय परप्रांतीय अल्पवयीन मुलाने विजेचा शॉक देऊन खून केला. सोमवारी पहाटे फैजानचा संशयास्पद मृत्यू झाला होता. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
आळते येथील निजामियाँ मदरसामध्ये सुमारे 90 मुले धार्मिक शिक्षण घेतात. तेथेच राहून फैजान नाजीम (मूळ बिहार) शिक्षण घेत होता. सोमवारी पहाटे तो उठला नसल्याने त्याला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला. तपासणी व शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृत्यू विजेचा शॉक लागून झाल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस चौकशीत मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहार येथीलच 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने मदरसा बंद पडून घरी जायला मिळावे म्हणून फैजान नाजीम याला झोपेत असताना रविवारी रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास विद्युत वायरीने शॉक देऊन त्याचा खून केल्याचे कबूल केले.