कोल्हापूर एलसीबीचा मोठा दणका: भरदिवसा घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
schedule13 Apr 26 person by visibility 37 categoryगुन्हे
कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील पिंपळगाव येथे भरदिवसा झालेली घरफोडी कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १२ तासांत उघडकीस आणली आहे. या कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण १५ लाख १० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१२ एप्रिल रोजी महादेव शिवराम चव्हाण यांच्या घरी अज्ञात चोरट्याने कौले काढून घरात प्रवेश करत दागिने लंपास केले होते. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे, अविनाश गंगाधर सुतार (वय २८) आणि रजत रामचंद्र खिलारे (वय ३०, दोन्ही रा. कनाननगर, कोल्हापूर) हे चोरीचे दागिने विकण्यासाठी जयंती नाला परिसरात येणार असल्याचे समजले. पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
तपासादरम्यान त्यांच्याकडून ९४.८२० ग्रॅम सोने, ९११ ग्रॅम चांदी आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर जिल्ह्यात यापूर्वीही घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.