संविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात डॉ. संबोधी देशपांडे यांचे विशेष व्याख्यान
schedule22 Nov 26 person by visibility 128 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने ‘भारतीय संविधान आणि स्त्री-पुरुष समानता’ या विषयावर जळगाव येथील डॉ. संबोधी देशपांडे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. बुधवार, दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान होईल. कुलगुरू डॉ. राजनीश कामत अध्यक्षस्थानी असतील, तर प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची प्रमुख उपस्थिती असेल.
डॉ. देशपांडे या समाजकार्य महाविद्यालय, चोपडा (जि. जळगाव) येथे कार्यरत असून बौद्ध संघर्ष समितीच्या राष्ट्रीय संघटिका म्हणूनही कार्यरत आहेत. भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समानतेला दिलेले स्थान, महिलांचे घटनात्मक अधिकार, सामाजिक न्याय, समान संधी आणि स्त्री-पुरुष समानतेच्या प्रस्थापनेतील संविधानाचे योगदान आदी महत्त्वपूर्ण पैलूंवर त्या मार्गदर्शन करणार आहेत.
विद्यापीठातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच संविधानप्रेमी नागरिकांनी या व्याख्यानास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. पवन गायकवाड यांनी केले आहे.