डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धेचे आयोजन
schedule15 Apr 26 person by visibility 118 categoryराज्य
कोल्हापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे आणि डॉ. आंबेडकरांच्या क्रांतीकारी विचारांचा प्रसार करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. त्यांच्या कार्याची व्याप्ती मोठी असली तरी, विशेषतः 'महिलांविषयी केलेले कार्य आणि महिला सक्षमीकरणातील योगदान' या विषयावर ही स्पर्धा केंद्रित असणार आहे.
स्पर्धकांसाठी दोन गट निश्चित करण्यात आले असून निबंध केवळ मराठी भाषेत असणे अनिवार्य आहे. गट १ (ITI विद्यार्थी): शासकीय व खासगी आयटीआयमधील शिकाऊ तसेच उत्तीर्ण विद्यार्थी यामध्ये भाग घेवू शकतात. शब्दमर्यादा: ५०० ते ८०० शब्द असणार आहे. गट २ (खुला गट): राज्यातील सर्व महिला व पुरुष यात सहभागी होऊ शकतात. शब्दमर्यादा: ८०० ते १२०० शब्द असणार आहे.
स्पर्धेचा कालावधी १४ ते २० एप्रिल आहे. स्पर्धेसाठी क्यू आर (QR) कोड उपलब्ध करून देण्यात आला असून, यावर नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केल्यावर स्पर्धकांना त्वरित पोचपावती मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९१५२२३०१९३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
उत्कृष्ट निबंधांना आकर्षक पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, विचारेमाळ, कोल्हापूर (दूरध्वनी: ०२३१-२५४५६७७) वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने करण्यात आले.