करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदन
schedule27 May 26 person by visibility 164 categoryराजकीय
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेषतः करवीर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेतील हजारो वृद्ध, अपंग व विधवा लाभार्थ्यांना गेल्या २ ते ३ महिन्यांपासून पेन्शन मिळाली नसल्याने त्यांचे मोठे हाल होत आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करवीरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात संजय गांधी पेन्शन योजनेचे सुमारे ६९ हजार ८८३ आणि श्रावणबाळ योजनेचे १ लाख २४ हजार ४७३ लाभार्थी आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसत अनेक वयोवृद्ध लाभार्थी बँकेत चकरा मारत आहेत, मात्र पेन्शन जमा न झाल्याने त्यांना औषधोपचारासाठी व दैनंदिन खर्चासाठी पैशांची तीव्र टंचाई भासत आहे. तसेच, महा ई-सेवा केंद्रामध्ये 'हयातीच्या दाखल्यासाठी' वृद्धांची मोठी गर्दी होत असून त्यांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्व्हे करावा आणि अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, डिसेंबर २०२४ च्या 'डी.बी.टी.' नियमांमुळे बँक खाते लिंक करण्याच्या प्रक्रियेत ज्या लाभार्थ्यांची ७ ते ८ महिन्यांची जुनी पेन्शन रखडली आहे, ती देखील शासनाकडून पाठपुरावा करून मिळवून द्यावी, अशी मागणी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, आणि उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह करण्यात आली आहे.