राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबई हवामान विभागाचा ५ दिवसांचा सुधारित अंदाज
schedule20 Jul 26 person by visibility 216 categoryराज्य
मुंबई : हवामान विभागाने (IMD) राज्यातील आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, २० ते २४ जुलै २०२६ दरम्यान अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने ठराविक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
या पाच दिवसांच्या कालावधीत हवामानातील बदलांचा आढावा घेतल्यास, २० जुलै रोजी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे व सातारा घाट, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर २१ जुलै रोजी पालघर, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा घाटात पावसाची शक्यता असून, याच दिवशी ठाणे, रायगड आणि पुणे घाटासाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे. २२ जुलै रोजी पुन्हा काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहील, ज्यात पालघर, ठाणे, रत्नागिरीसह नाशिक, सातारा घाट, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीचा समावेश आहे. रायगड व पुणे घाटासाठी या दिवशीही 'ऑरेंज अलर्ट' कायम असेल.
२३ जुलै रोजी पावसाचा विस्तार वाढून पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह नाशिक, कोल्हापूर, जळगाव, संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटासह भंडारा व गोंदियामध्ये पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित भागातील नागरिकांनी हवामानातील बदल लक्षात घेता काळजी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.