कामगारांच्या कष्टांवर महाराष्ट्राचे वैभव : मंत्री मंगलप्रभात लोढा
schedule01 May 26 person by visibility 97 categoryराज्य
मुंबई : कामगारांच्या कष्ट आणि योगदानामुळेच महाराष्ट्राचे वैभव उभे राहिले असून राज्य प्रगतीच्या मार्गावर वेगाने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आज महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. ध्वजवंदनास जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापुरे, उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, महेश हरिश्चंद्रे, महादेव किरवले, प्रशांत पानवेकर, भूमी अभिलेख अधीक्षक धनाजी धायगुडे, आणीबाणी काळात कारावास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी तसेच महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री लोढा यांनी सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. श्री. लोढा म्हणाले, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी बलिदान दिले त्या हुतात्म्यांचे योगदान अमूल्य आहे. आजचे राज्याचे वैभव हे कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या परिश्रमाचे फलित आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर 30व्या क्रमांकावर पोहोचल्याचा उल्लेख करत त्यांनी याबाबतचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले. मात्र, राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी केवळ शासनाचे प्रयत्न पुरेसे नसून प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेची आहे, असे सांगत त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाचाही उल्लेख केला.
वाढत्या पर्यावरणीय संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धन ही काळाची गरज असून नागरिकांनी यासाठी यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर, प्रशासनातील अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत सर्वांनी एकत्रितपणे राज्याच्या विकासासाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
संविधानाच्या बळावर महाराष्ट्र देशात अग्रस्थानी : जिल्हाधिकारी आंचल गोयल
महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून संत, विचार आणि शौर्याची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान, महात्मा फुले यांचे विचार आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या बळावर महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे, असे गौरवोद्गार मुंबई शहर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी काढले.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या, आपल्यासमोर उभारलेल्या पायाभूत सुविधा हे कामगारांच्या कष्टाचे फलित आहे. शेतकरी, कारखान्यातील कामगार तसेच बांधकाम क्षेत्रातील मजूर यांचे खरे देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी पार पाडून राज्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन करत महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी महसूल शाखेमार्फत तयार करण्यात आलेले मुंबई शहरातील भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय मिळकतींच्या कामकाजासाठी ‘ई लिज लॅण्ड’ या नवीन प्रणालीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सुरक्षा रक्षक समीर कोळवणकर, सुरक्षा रक्षक कृष्णात पाटील आणि सुरक्षा पर्यवेक्षक प्रमोद महाले यांचा विशिष्ट सेवेसाठी कामगार विभागामार्फत मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिला व बाल विकास विभागामार्फत सन 2020-21 वर्षीचा जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार श्रीमती सीमा देशपांडे यांना, सन 2021-22 चा पुरस्कार शैलजा गंटूक यांना आणि सन 2022-23 चा पुरस्कार श्रीमती कुंदा फाटक यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे क्रीडा विभागामार्फत सन 2021-22 करिता राही या सामाजिक संस्थेला आणि सन 2024-25 करिता ममता सामाजिक संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विघ्नेश मुरकर यांनाही सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.