डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule03 Apr 26 person by visibility 154 categoryराज्य
🔳भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न
मुंबई, दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा सोहळा त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरा करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल, २०२६ रोजीच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यामागील उद्देश केवळ औपचारिकता नसून त्यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणे असा आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे जयंती सोहळा हा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारा पर्व ठरतो.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि.१४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी. उष्णतेपासून संरक्षण मिळावे यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत. प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.
नागरिकांना मार्गदर्शन होण्यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, शिवाजी महाराज मैदानावरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिध्दी याबाबत चर्चा झाली व याबाबत निर्देश देण्यात आले.
बैठकीत मुंबई महापालिकेच्यावतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.