आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांचा भावपूर्ण निरोप समारंभ
schedule06 Apr 26 person by visibility 120 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची दि. 2 एप्रिल 2026 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे येथे अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती झाल्याबद्दल महानगरपालिकेच्यावतीने त्यांना आज भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या छत्रपती शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रुपाराणी निकम यांनी आपल्या मनोगतात नगरसेवक होणे सोपो आहे पण अधिकारी होणे अवघड आहे. आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांचे मी अभिनंदन करते की त्यांनी आवाहनात्मक परिस्थीत चांगल्या प्रकारे महापालिका सांभाळली. कोल्हापूर नगरी ही छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. कोल्हापूरसारख्या उच्च अपेक्षा असलेल्या शहरात त्यांनी प्रभावीपणे प्रशासकीय कारर्किद पूर्ण केली. अंबाबाई चरणी मी अशी प्रार्थना करते की, तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा आनंद येवो व आपल्या सर्व इच्छा पुर्ण होवो असे नमूद करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी आयुक्तांच्या सकारात्मक कार्यपद्धतीचा उल्लेख करत, त्यांच्या कार्यकाळात कधीही नकारात्मक अनुभव आला नसल्याचे सांगितले. त्यांनी कोल्हापूरमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल अभिनंदन करून पुढील पदोन्नतीस शुभेच्छा दिल्या.
नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी प्रशासकीय काळात त्यांनी ठेवलेल्या शिस्तबद्ध कारभाराचे विशेष कौतुक केले. कमी उत्पन्नाच्या परिस्थितीतही महापालिकेचा कारभार सक्षमपणे हाताळत त्यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्णत्वाकडे नेले. तसेच 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याची प्रक्रिया गतीमान केली. आपण शहरामध्ये कामकाज करताना सॉफ्ट पध्दतीने सर्व कामे मार्गी लावली याबद्दल आपले अभिनंद करतो.
आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी आपल्या निरोपपर भाषणात बोलताना येथे येण्यापुर्वी जिल्हाधिकारी म्हणून काम करताना अनुभव वेगळाच होता. पण कोल्हापूर शहरात काम करणे म्हणजे अंबाबाईची सेवा केल्यासारखा अनुभव मिळाला. केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम पूर्ण झाल्यानंतरही मी या शहरात नाट्यगृह पाहण्यास पुन्हा भेट देणार आहे. महापालिकेच्या नुतन इमारतीसाठी 5 एकर जागा शेडापार्कमध्ये घेतले आहे. त्याठिकाणी प्रशस्त कोल्हापूर महापालिकेची इमारत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. महापालिकेच्या कामकाजामधून मला खूप अनुभव मिळाला आहे. मी लहान असताना शाळेमध्ये पुस्तकात वाचले होते की करवीर निवासीनी त्याच शहरात मला काम करण्याची संधी मिळाली. आपली कोल्हापूर महानगरपालिका अजून खूप पुढे जावो हिच अंबाबाई चरणी मी प्रार्थना करते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार अधिकारी राम काटकर यांनी केले, तर आभार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी मानले..
या कार्यक्रमास उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेते शारगंधर देशमुख, इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक संजय मोहिते, ऋतूराज क्षिरसागर, विजयसिंह देसाई, उमेश पोवार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, जल अभियंता हर्षजीत घाटगे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.