गोकुळ दूध संघ निवडणूक निकाल: महायुतीमधील भांडणे आणि बाद मते ठरली पराभवाचे कारण : नामदार हसन मुश्रीफ
schedule19 Oct 26 person by visibility 314 categoryराजकीय
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, दूध उत्पादक सभासद शेतकऱ्यांनी दिलेल्या निकाला आपण पूर्णपणे स्वीकारत असल्याचे नामदार हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
या निवडणुकीच्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया देताना मुश्रीफ यांनी महायुतीमधील घडामोडींवर आणि निकालाच्या कारणांवर भाष्य केले आहे.
निकालाचा स्वीकार: दूध उत्पादक सभासदांनी कौल देत जो निकाल दिला आहे, त्याचे स्वागत करत तो आम्ही नम्रपणे स्वीकारत असल्याचे त्यांनी म्हटले.
या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली अंतर्गत भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित सामान्य जनतेला किंवा मतदारांना आवडलेली नसावी, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर बाद झालेली मतेही लक्षणीय असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व नवीन उमेदवारांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच गोकुळ दूध संघाचे नवीन संचालक मंडळ कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साडेपाच लाख शेतकरी कुटुंबांचे कल्याण साधेल, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.
भविष्यात राजकीय मतभेद बाजूला सारून सबंध कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणाच्या भूमिकेतून गोकुळ दूध संघाच्या उत्कर्षासाठी लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.