तावडे हॉटेल ते गांधीनगर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई
schedule19 Oct 26 person by visibility 133 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : छ.ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन, विभागीय कार्यालय क्रं.4 छ.ताराराणी मार्केट व उपद्रव शोध पथकाने अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली.
छ.ताराराणी चौक ते तावडे हॉटेल या परिसरात कारवाईवेळी 21 डिजीटल बोर्ड, 25 झेंडे, 2 कॅरेट, 2 काटे तसेच तावडे हॉटेल ते गांधीनगर या परिसरात कारवाई करुन 27 लोखंडी पाईप, 2 लोखंडी स्टॅण्ड, 4 कमान बोर्ड, 2 जाळी स्टॅण्ड, 3 बोर्ड, 10 फायबर खुर्च्या, 1 जाहिरात बोर्ड व 1 मोठी छत्री जप्त करण्यात आल्या.
शहरातील अनधिकृत व्यवसाय आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. जप्त करण्यात आलेले साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत दिले जाणार नसून, ते कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्याचे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार आणि उपआयुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
सहा.आयुक्त डॉ.विजय पाटील, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम प्रदीप तवंदकर व प्रशांत आकुर्डेकर यांच्यासह अतिक्रमण, विभागीय कार्यालय क्रं.4 कडील कर्मचारी आणि उपद्रव शोध पथकातील जवान या मोहिमेत सहभागी झाले होते.
◼️अतिक्रमणधारकांना महापालिकेचा इशारा
शहरातील अनधिकृत फेरीवाले, व्यावसायिक, रस्त्यांवर उभारलेले अनधिकृत शेड्स आणि इतर अतिक्रमणांविरोधातील कारवाई आगामी काळात अधिक तीव्र करण्यात येणार आहे. संबंधितांनी आपापली अतिक्रमणे तातडीने स्वतःहून हटवावीत. अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून जप्त केलेले साहित्य परत दिले जाणार नाही, असा इशारा कोल्हापूर महानगरपालिकेने दिला आहे. तसेच अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.