जयसिंगपूर येथे नूतन बस स्थानकाच्या इमारतीचा लोकार्पण : एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व सुलभ प्रसाधनगृह मोफत करणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
schedule17 Apr 26 person by visibility 167 categoryराज्य
जयसिंगपूर : एसटी महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व प्रसाधनगृहे मोफत करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला जाईल. तसेच शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड आगाराला १० बसेस, तर इचलकरंजी आगाराला १५ बसेस देण्याची घोषणा केली. कोल्हापूर विभागाला एकूण १२० नवीन बसेस देण्यात येणार असून जयसिंगपूर बस स्थानकाची इमारत दुमजली उभारण्यासाठी चालू आर्थिक वर्षात तात्काळ निधीची तरतूद केली जाईल, बसस्थानकात दर चार तासांनी स्वच्छता, रात्री थांबणाऱ्या बसची यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात येणार आहे. या सर्व निर्णयांमुळे प्रवास अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ होणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
२ कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात आलेल्या जयसिंगपूर येथील नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा नामदार सरनाईक यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी फित कापून नूतन बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला.
प्रारंभी स्वागत जयसिंगपूर चे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी केले. प्रास्ताविक एसटी महामंडळाच्या अमृता ताम्हणकर यांनी केले.
या वेळी बोलताना नामदार सरनाईक म्हणाले, एसटी महामंडळ प्रवासी-केंद्रित धोरणावर कार्यरत असून, नागरिकांना अधिक दर्जेदार सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले. वाढत्या शहरीकरण आणि प्रवासी संख्येचा विचार करता आधुनिक, सुरक्षित व सुसज्ज पायाभूत सुविधा उभारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
जयसिंगपूर हे शहर केवळ व्यापारी केंद्र नसून ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारे शहर आहे. या पार्श्वभूमीवर अशा विकसित शहरात आधुनिक बस स्थानक उभारणे ही महत्त्वाची पायरी असल्याचे त्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः स्वच्छता, सुरक्षितता आणि सेवा दर्जा उंचावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवाशांनीही सार्वजनिक सुविधांचा वापर करताना जबाबदारीने वागून स्वच्छता राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. याशिवाय, स्थानिक स्तरावरील विविध समस्यांबाबत लवकरच बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. भविष्यात एसटी सेवा अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बस स्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी परिवहन विभागासमोर विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. जयसिंगपूर हे चार जिल्ह्यांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असल्याने वाहतूक आणि प्रवासी सुविधांवर मोठा ताण येत असल्याचे त्यांनी नमूद केले. बस स्थानकाला सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत (कंपाउंड) उभारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. रेल्वेने रात्री उशिरा येणाऱ्या प्रवाशांसाठी निवाऱ्याची सोय नसल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बस स्थानक परिसरात यात्रेकरू व प्रवाशांसाठी ‘यात्री निवास’ उभारण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमणूक करण्याची गरज त्यांनी मांडली. अवजड वाहनांच्या तपासणीसाठी स्थानिक स्तरावरच ट्रॅकला मान्यता देण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना कोल्हापूरला जावे लागू नये, अशीही मागणी त्यांनी केली. कुरुंदवाड आगारातील तोटा कमी करण्यासाठी स्वमालकीच्या बसेस उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे जांभळी दरम्यानच्या भागात एटीएससाठी स्थापन करण्यात यावे, या सर्व मागण्यांच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवून परिवहन व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावे या मागणीची निवेदन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले.
कार्यक्रमास हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण सभापती श्रद्धाताई गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या उत्तरा देवी शिंदे, उद्योजक अण्णासाहेब चकोते, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, उपसभापती मनीषा कदम, अमरसिंह पाटील, जयसिंगपूरच्या उपनगराध्यक्ष अनुराधा आडके, कुरूंदवाडचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, पंचायत समिती सदस्य सीमा म्हैशाळे, दीप्ती जाधव, मिलिंद भिडे, अमरसिंह निकम, राजेंद्र नांदरेकर, धनाजीराव जगदाळे सतीश मलमे, जयपाल कुंभोजे, अर्चना आडगाणे, रमेश यळगुळकर, रणजितसिंग पाटील, कुणाल सिंह निंबाळकर, कार्यकारी अभियंता नागेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, अभय देशमुख, अनिल म्हेतर बिस्मिल्ला सय्यद यांच्यासह शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार अभय देशमुख यांनी मानले.