राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर, १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
schedule15 Dec 25 person by visibility 174 category
मुंबई : बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
येथील सह्याद्री अतिथीगृहात महानगरपालिका निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. वाघमारे यांनी सांगितले की, सर्व महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून राबविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना 16 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होईल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांची अधिसूचना 18 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. अधिसूचना प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया संबंधित महानगरपालिका आयुक्त आपापल्या स्तरावर पार पाडतील. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील महानगरपालिकेच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शासनाला महानगरपालिका कार्यक्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेता येणार नाहीत. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असेल. त्याचबरोबर 4 नोव्हेंबर 2025 रोजी कायदा व सुव्यवस्थेसंदर्भातदेखील आदेश निर्गमित केले आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या 2 नवनिर्मित महानगरपालिका आहेत. 5 महानगरपालिकांची मुदत 2020 मध्ये संपली आहे. सर्वाधिक 18 महानगरपालिकांची मुदत 2022 मध्ये संपली होती; तर 4 महानगरपालिकांची मुदत 2023 मध्ये संपली आहे. मुदत समाप्तीची महानगरपालिकानिहाय तारीख अशी: छत्रपती संभाजीनगर: 27 एप्रिल 2020, नवी मुंबई: 07 मे 2020, वसई- विरार: 28 जून 2020, कल्याण- डोंबिवली: 10 नोव्हेंबर 2020, कोल्हापूर: 15 नोव्हेंबर 2020, नागपूर: 04 मार्च 2022, बृहन्मुंबई: 07 मार्च 2022, सोलापूर: 07 मार्च 2022, अमरावती: 08 मार्च 2022, अकोला: 08 मार्च 2022, नाशिक: 13 मार्च 2022, पिंपरी- चिंचवड: 13 मार्च 2022, पुणे: 14 मार्च 2022, उल्हासनगर: 04 एप्रिल 2022, ठाणे: 05 एप्रिल 2022, चंद्रपूर: 29 एप्रिल 2022, परभणी: 15 मे 2022, लातूर: 21 मे 2022, भिवंडी- निजामपूर: 08 जून 2022, मालेगाव: 13 जून 2022, पनवेल: 9 जुलै 2022, मीरा- भाईंदर: 27 ऑगस्ट 2022, नांदेड- वाघाळा: 31 ऑक्टोबर 2022, सांगली- मीरज- कुपवाड: 19 ऑगस्ट 2023, जळगाव: 17 सप्टेंबर 2023, अहिल्यानगर: 27 डिसेंबर 2023, धुळे: 30 डिसेंबर 2023, जालना: नवनिर्मित आणि इचलकरंजी: नवनिर्मित.
▪️बहुसदस्यीय पद्धत
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यावयाचा असल्याने प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावे लागेल. उर्वरित सर्व 28 महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत: चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागांत तीन अथवा पाच जागा असतील. त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने किमान 3 ते 5 मते देणे अपेक्षित असेल.
▪️नामनिर्देशनपत्रे ऑफलाईन पद्धतीने
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे; परंतु विविध राजकीय पक्ष आणि नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांतील उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाईन पद्धतीनेच नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील.
▪️निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी - २३ ते ३० डिसेंबर
- नामनिर्देशन पत्र छाननी ३१ डिसेंबर २०२५
- उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६
- निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी - ३ जानेवारी २०२६
- मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी
- निवडणूक निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी





