कोल्हापुरात काँग्रेस मंगळवार, बुधवारी घेणार इच्छुकांच्या मुलाखती
schedule15 Dec 25 person by visibility 185 categoryराजकीय
कोल्हापूर : गत महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने यंदाच्या महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यानंतरच उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवार व बुधवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, विक्रम जरग, तौफीक मुल्लाणी, भारती पोवार, भरत रसाळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.
प्रभाग क्रमांक १ ते १० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी दुपारी १ ते सायंकाळी ५ :३० वाजेपर्यंत घेण्यात येतील. तर प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी सकाळी ९ ते दुपारी १ :३० वाजेपर्यंत घेण्यात येतील. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी काँग्रेसकडे २३० हून अधिकजणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. एका एका प्रभागात डझनभरहून अधिक इच्छुक असल्याने उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागणार आहे. त्यामुळे उमेदवाराचे प्रभागातील काम, जनसंपर्क व पक्षाशी निष्ठा या सुत्रानुसार उमेदवारी देताना विचार केला जाणार आहे.





