पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज; आंतरराज्य समन्वयावर भर
schedule21 Jul 26 person by visibility 132 categoryराज्य
कोल्हापूर : पावसाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील प्रशासनामध्ये सक्षम आणि सातत्यपूर्ण आंतरराज्य समन्वय यंत्रणा कार्यरत असून पूर व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक घटकाची दैनंदिन माहिती परस्परांना उपलब्ध करून दिली जात आहे. जिल्ह्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा अतिवृष्टी आणि पूरप्रवण असल्याने जिल्ह्यातील विविध धरणे व नद्यांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह कृष्णा नदीत एकवटतो. शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधाऱ्यानंतर कृष्णा नदी कर्नाटक राज्यात प्रवेश करते. त्यामुळे कर्नाटकातील हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाणी व्यवस्थापन व विसर्ग यांचा कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर थेट परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्हा प्रशासनाशी प्रभावी समन्वय प्रस्थापित केला आहे.
पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यासाठी दोन्ही राज्यांतील जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागामार्फत दैनंदिन पर्जन्यमान, धरणांतील पाणीसाठा, विसर्ग, नदीपात्रातील प्रवाह आदींची नियमित माहिती एकमेकांना पाठविली जाते. ई-मेल, व्हॉट्सअॅपसह विविध डिजिटल माध्यमांचा यासाठी प्रभावी वापर केला जात असून आवश्यक माहितीची तत्काळ देवाण-घेवाण केली जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील पर्जन्यमान, धरणांतील पाणीसाठा आणि नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्याची माहिती कर्नाटक प्रशासनाला नियमितपणे पाठविली जाते. त्याचप्रमाणे हिप्परगी बंधारा आणि अलमट्टी धरणात प्राप्त झालेल्या पाण्याचे प्रमाण, उपलब्ध साठा आणि करण्यात आलेला विसर्ग याबाबतचा दैनंदिन अहवाल कर्नाटक प्रशासनाकडून कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिला जातो.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आंतरराज्य समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी हिप्परगी आणि अलमट्टी धरण परिसरासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता यांच्या माध्यमातून कर्नाटक प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून पाणीपातळी, पाणीसाठा आणि विसर्गाबाबतचे अहवाल नियमितपणे देवाण-घेवाण केले जात आहेत.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पर्जन्यमान, नद्यांतील वाढती पाणीपातळी, धरणांतील साठा आणि कृष्णा नदीमार्गे कर्नाटकात जाणारा पाण्याचा प्रवाह याबाबतची माहिती कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट आणि विजापूर या जिल्ह्यांसाठीही अत्यंत महत्त्वाची असल्याने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फतही सातत्यपूर्ण समन्वय राखला जात आहे.
याशिवाय, राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आंतरराज्य समन्वयासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करवीर, हातकणंगले आणि शिरोळ या पूरप्रवण तालुक्यांना क्षेत्रभेटी देऊन स्थानिक प्रशासनासोबत पूरपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.