कोल्हापूर : पाण्यासाठी सभापती विशाल शिराळेंचा मध्यरात्रीपर्यंत ठिय्या; चंबुखडी टाकीवरून थेट नियोजन
schedule18 Jun 26 person by visibility 153 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी खालावली असून, थेट पाईपलाईन योजनेअंतर्गत होणारा पाणीउपसा बंद झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी पंचगंगा नदीची पाणीपातळी ५३३ मीटरवर आल्याने शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी या तिन्ही पंपिंग स्टेशनमधूनही पाणीउपसा थांबला होता. परिणामी शहरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत महापालिकेच्या सभापतींनी महासभा संपताच सदस्यांसह चंबुखडी टाकीवर धाव घेतली. पाणीपुरवठ्याच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांनी जल अभियंतांकडून सविस्तर माहिती घेतली. यावेळी गटनेते इंद्रजीत बोंद्रे, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसेवक अभिजीत मोकाशी, विनायक फाळके, अभय तेंडुलकर, महेश महाडीक, सुधीर राणे, शाखा अभियंता मयूरी पटवेगार आदी उपस्थित होते.
चंबुखडी टाकीवरील आढावानंतर सभापतींनी थेट शिंगणापूर उपसा केंद्र गाठून पाणीउपशाची स्थिती तपासली. नदीतील पाण्याची पातळी वाढल्यानंतर उपसा पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे का, याची खातरजमा करत कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पुन्हा चंबुखडी टाकीवर येऊन टाकीतील पाणीसाठ्याचा आढावा घेतला. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सभापतींनी पाटबंधारे विभागाशी दूरध्वनीवर संपर्क साधत अधिक पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच शहरातील टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना जल अभियंता यांना दिल्या.
विशेष म्हणजे, चंबुखडी टाकीतील पाण्याची पातळी ४० फूट होईपर्यंत सभापती या ठिकाणी बसून होते. रात्री उशिरापर्यंत ते स्वतः संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. अखेर रात्री सुमारे २ वाजता चंबुखडी टाकीतील पाण्याची पातळी ४० फुटांपर्यंत पोहोचल्यानंतरच सभापती आणि सदस्यांनी तेथून परतले.