जेष्ठांचा अनुभव हीच व्यवसायाची शिदोरी; कोल्हापुरात अमृतमहोत्सवी व्यापाऱ्यांचा दिमाखदार सत्कार
schedule03 Mar 26 person by visibility 75 categoryसामाजिक
कोल्हापूर: "व्यवसायात चढ-उतार येतच असतात, मात्र अशा वेळी घरातील जेष्ठांचा सल्ला घेतल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. जेष्ठांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नव्या पिढीने आपल्या व्यवसायाची भरभराट करावी," असे आवाहन कोल्हापूर किराणा आणि भुसारी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी केले.
किराणा आणि भुसारी व्यापारी असोसिएशनच्या ८१ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अमृतमहोत्सवी सभासदांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्रदीर्घ प्रवासाचा आढावा घेताना कापडिया यांनी सांगितले की, 'एकमेका सहाय्य करू, अवघे धरु सुपंथ' या उक्तीप्रमाणे सर्वांनी एकजुटीने काम केल्यास कोणतीही अडचण मोठी राहत नाही.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. जेष्ठांचा सन्मान केल्याने तरुण पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चेंबर सदैव कटिबद्ध असल्याचे ग्वाही त्यांनी दिली.
या सोहळ्यात महादेव गाडवे यांच्या हस्ते अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या २० हून अधिक ज्येष्ठ सभासदांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये: मनोहर शेट्टी, भगवानजी पटेल, प्रदीपभाई कापडिया, भगवानजी भूत (पटेल), महेशभाई पटेल. जीवनभाई पटेल, विश्वनाथ सांगावकर, पुरुषोत्तम सावसानी, खेमचंद आग्रवाल, शितल कोल्हापूरकर. भरमाप्पा बुढ्ढे, अजितराव कत्ते, अरविंद काशिद, हेमंत पटेल, बाळासो गाताडे, विजय भिवटे, अशोकभाई शहा, अशोक घोडके, बबन महाजन आणि सुरेश महाजन यांचा समावेश होता.
या कार्यक्रमास कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष भरत ओसवाल, संजीव परीख, किरण शहा, मिलिंद अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिजा ताशी यांनी केले तर आभार अजित कारंडे यांनी मानले.