महाराष्ट्र दिनानिमित्त आप तर्फे ज्येष्ठ रिक्षाचालकांचा सत्कार
schedule02 May 25 person by visibility 316 categoryसामाजिक

कोल्हापूर : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आप रिक्षाचालक संघटनेतर्फे ज्येष्ठ रिक्षाचालकांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ रिक्षाचालकांनी दिलेल्या प्रदीर्घ सेवेच्या सन्मानार्थ याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्त चाळीसहुन अधिक रिक्षाचालकांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप रिक्षाचालक संघटना, पुणे येथील वरिष्ठ सल्लागार श्रीकांत आचार्य होते.
ऊन-वारा-पाऊस याची परवा न करता, आपत्कालीन परिस्तिथी मध्ये मदतीला धावून येणारे, तसेच वैद्यकीय गरज, शिक्षण, दैनंदिन वाहतुकीचा कणा म्हणून रिक्षाचालक काम करत असतात. वयाने ज्येष्ठ असूनही आपली सेवा अखंडित ठेवणारे अनेक रिक्षाचालक आहेत. रिक्षाचालक हा कधीच रिटायर होत नाही, त्यांची सेवा ही अविरत असते असे गौरवोदगार आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी काढले.
येथून पुढे एक मे हा रिक्षाचालकांच्या सन्मानाचा दिवस म्हणून आम्ही साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केदार ढमाले, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे यांची भाषणे झाली.
बाबुराव बाजारी यांनी प्रास्ताविक केले. संघटनेचे शहराध्यक्ष संजय नलवडे, कय्युम पठाण, शकील मोमीन, प्रभाकर चौगुले, मंगेश मोहिते उपस्थित होते.समारोप राकेश गायकवाड तर सूत्रसंचालन मोईन मोकाशी यांनी केले.