कोल्हापूर आणि इचलकरजीत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी: शोभायात्रेतून विश्वशांती अन् सलोख्याचा संदेश!
schedule27 Aug 26 person by visibility 234 categoryसामाजिक
कोल्हापूर : पैगंबर हजरत मोहम्मद (स्व:) यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात 'ईद-ए-मिलाद' उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या सद्भावना शोभायात्रेत सहभागी झालेले रथ, रंगीबेरंगी पताका, तिरंगा, घोडेस्वार आणि बालगोपाळ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
या शोभायात्रेच्या माध्यमातून विश्वशांती, बंधूभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम पार पडले.
◼️कोल्हापुरात भव्य शोभायात्रा आणि रक्तदान शिबिर
पैगंबर हजरत मोहम्मद (स्व:) यांच्या जयंती निमित्त कोल्हापूर जिल्हा अहले सुन्नत जमातच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी चौकातील घोडणपीर दर्ग्यातून या शोभायात्रेला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. मुस्लिम बांधवांच्या गर्दीत आणि उत्साहात पैगंबर जयंतीच्या घोषणा देत ही शोभायात्रा पापाची तिकटी, गंगावेश मार्गे बाबुजमाल दर्गाजवळ आली.
यात्रेदरम्यान नाथ पठन करण्यात आले आणि बाबुजमाल दर्गाजवळ विश्वशांतीसाठी प्रार्थना करून यात्रेची सांगता झाली. त्यानंतर रक्तदान शिबिर पार पडलं, ज्यामध्ये मुस्लिम बांधवांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केलं. तसेच सरबत वाटप, फळ वाटप, मिठाई वाटप करण्यात आले.
या शोभायात्रेचे संयोजक फिरोज सतार मेकर, हाजी मुबारक काझी, शफी अत्तर, लियाकत मुजावर, रशीद काझी, रफीक मौलाना, शकील मुत्तवल्ली, बालम झारी, शकील मोमीन, जैनुल इनामदार, रियाज खान, शाहरुख गडवाले, शफी पटेल, नासीर कच्छी यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
◼️इचलकरजीत पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत उत्साही सोहळा
इचलकरंजीतील मुस्लिम समाजाच्या वतीने ईद-ए-मिलाद उत्सवानिमित्त सद्भावना शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शर्मा यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या विचारांच्या मार्गाचा अवलंब करावा, असं आवाहन केले.
यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, निरीक्षक महेश चव्हाण, गजानन लोहार यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. झाकीर हुसेन तरुण मंडळानं या शोभायात्रेचं स्वागत केले.
शोभायात्रेच्या अग्रभागी मक्का, मदिना आणि अजमेर दर्ग्याच्या प्रतिकृती लक्षवेधी ठरल्या. हातात ध्वज, रंगीबेरंगी पताका घेतलेली तरुणाई, फडकणारा तिरंगा आणि पैगंबर मोहम्मद यांच्या धार्मिक, सामाजिक विचारांचा संदेश देणारे फलक, घोडेस्वार तसेच बालगोपाळ सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. तर नारे तक्बीर, अल्लाहु अकबरच्या घोषणांनी शोभायात्रेचा परिसर दुमदुमून गेला.
अनेक ठिकाणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत सरबत, पाणी आणि केळीचं वाटप केलं. थोरात चौक, मलबारी चौक, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक मार्गे गावभागातील मगदूम दर्गा इथे या शोभायात्रेचा समारोप झाला. यावेळी देशात शांतता, ऐक्य, बंधूभाव आणि सद्भावना नांदण्यासाठी मौलवींनी विशेष दुआ पठन केले. इचलकरंजीतील शोभायात्रेतही मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते,