‘डिजिटल इम्युनिटी’ पथदर्शी कार्यशाळा शनिवारी
schedule02 Jul 26 person by visibility 96 categoryराज्य
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने शालेय विद्यार्थी आणि महिलांच्या सायबर सुरक्षिततेसाठी ‘डिजिटल इम्युनिटी’ या विषयावर एकदिवसीय पथदर्शी कार्यशाळेचे आयोजन शनिवार, 4 जुलै रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शाहू स्मारक सभागृह, दसरा चौक करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता होणार असून कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थी आणि महिलांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प असून, त्याची सुरुवात ऐतिहासिक कोल्हापूर शहरातून होत आहे.
हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकरता करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाचे प्रशासकीय अधिकारी राजेश वैद्य यांनी दिली आहे.