कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन: पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ, बळीराजा सुखावला!
schedule02 Jul 26 person by visibility 86 categoryराज्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, ढगाळ हवामानासह पावसाचा जोर चांगल्याच प्रमाणात वाढला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या आणि तलावांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन ती राजाराम बंधाऱ्यावर १३ फुटांवर पोहोचली आहे.
या वाढत्या पाणी पातळीमुळे जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
दुसरीकडे, पावसामुळे शेती व्यवसायाला संजीवनी मिळाली असून, खरिपाच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत खरिपाच्या २३.५७ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात आणि मका पिकाची २७ टक्के, तर सोयाबीनची ३३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पेरणीच्या कामात अधिक गती येईल, असा विश्वास कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.