प्रशासनाच्या 'शब्दाला' हरताळ; कोल्हापुरात १५ जूनपासून शेतकरी उतरणार आमरण उपोषणाला
schedule05 Jun 26 person by visibility 121 categoryसामाजिक
कोल्हापूर: शेत रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार मिळणारी केवळ तोंडी व लेखी आश्वासने आता फोल ठरली असून, प्रशासनाच्या या दिरंगाई आणि फसवणुकीच्या निषेधार्थ 'महाराष्ट्र राज्य शिवानंद शेतरस्ता चळवळ' कृती समिती, कोल्हापूर आक्रमक झाली आहे. शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून शेतकऱ्यांना हक्काचा रस्ता मिळवून देण्यासाठी प्रशासनाने दिलेली आश्वासने पाळली नसल्याने, आता १५ जूनपासून करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा कठोर निर्णय समितीने घेतला आहे.
प्रशासनाने दिलेली आश्वासने कागदावरच राहिली असून, त्यामध्ये पिके काढण्याची जबाबदारी प्रशासनाने घेण्याबाबतचे लेखी आश्वासन असो किंवा ३० दिवसांत अतिक्रमण न काढल्यास 'फार्मर आयडी' व 'आधार कार्ड' ब्लॉक करण्याची कठोर कारवाई, यापैकी कोणतीही ठोस कृती झालेली नाही. समितीच्या आरोपानुसार, प्रशासन केवळ वेळ मारून नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. नकाशावर नोंद असलेले आणि बंद पडलेले रस्ते अतिक्रमणमुक्त करून देण्याऐवजी, सध्या सुरू असलेल्या रस्त्यांवरच शासकीय निधी खर्च करून प्रशासन वेळकाढूपणा करत आहे.
या अन्यायाविरुद्ध न्याय मिळवण्यासाठी आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ आली आहे, असे सांगत जोपर्यंत जमिनीवर प्रत्यक्ष कारवाई होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा समितीने दिला आहे.
या आमरण उपोषणात कृष्णात भगवान जाधव, बाजीराव शंकर पाटील, उत्तम जानू जाधव, बाबू नाना पाटील, कृष्णात धोंडीराम पाटील आणि मारुती भाऊ खाडे हे शेतकरी सहभागी होणार आहेत.