सोनं बनावट, पण बेड्या खऱ्या! युनियन बँकेला गंडवणारा ठकसेन आता कोठडीत
schedule10 Mar 26 person by visibility 168 category
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडाकेबाज कारवाई करत गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या दोन सराईत फरार आरोपींना जेरबंद केले आहे. यामध्ये ३ कोटी ६२ लाखांच्या गुंतवणुकीच्या अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि बनावट सोने तारण ठेवून बँकेला गंडवणाऱ्या आरोपीचा समावेश आहे.
पहिली मोठी कारवाई 'सांन्वीक वेल्थ मॅनेजमेंट' आर्थिक फसवणूक प्रकरणात करण्यात आली. दाभोळकर कॉर्नर येथे कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांना अवघ्या चार महिन्यात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवून आरोपी प्रताप लक्ष्मण गोसावी (रा. शिगाव, जि. सांगली) याने ३ कोटी ६२ लाख रुपयांचा अपहार केला होता. गेल्या ४ वर्षांपासून तो फरार होता. पोसई शेष मोरे यांच्या पथकाने गोसावी याला त्याच्या राहत्या घरातून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दुसऱ्या कारवाईत लक्ष्मीपुरी येथील युनियन बँक ऑफ इंडियामध्ये बनावट सोने तारण ठेवून फसवणूक करणाऱ्या भूषण तानाजी धानवडे (राहणार मांडरे, तालुका करवीर) याला अटक करण्यात आली. गेली २ वर्षे तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने मांडरे गावात सापळा रचून त्याला अटक केली.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि त्यांच्या टीमने ही धडाकेबाज कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.