SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात ‘प्रारंभ २०२५’ उत्साहात आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढवणार : नाम. चंद्रकांतदादा पाटीलजिल्ह्यात हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता मोहीम राबविणार : मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस.अवयवदान मोठं पुण्याईच काम : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकरमहादेवीला नांदणीला परत पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकार, नांदणी जैन मठ आणि वनतारा एकत्रितपणे न्यायालयाला विनंती करणार कोल्हापूर विमानतळाच्या वेगवान विकासाबाबत सकारात्मक चर्चावर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉलसाठी निवड चाचणीत सहभागी होण्याचे आवाहनशिरोळ तालुक्यात तरुणाचा खून, हल्लेखोरांचा शोध सुरुमराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळाकोल्हापुरात पतीने केला पत्नीचा खून, स्वतः पोलिस ठाण्यात फोन करून दिली खुनाची कबुली

जाहिरात

 

वनांचा रक्षक : वाघ

schedule29 Jul 25 person by visibility 416 categoryराज्य

▪️आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन विशेष

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जागतिक स्तरावर वाघांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. याचा उद्देश वाघांचे अस्तित्व असलेल्या सर्व देशांना एकत्र येवून त्यांचे संवर्धन आणि व्यवस्थापनाचे प्रयत्न वाढवणे हा आहे. हा दिवस वाघांना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल आणि त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे एक व्यासपीठ म्हणून काम करतो. २३ नोव्हेंबर २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय व्याघ्र मंचात 'सेंट पीटर्सबर्ग डिक्लेरेशन ऑन टायगर कॉन्झर्व्हेशन' स्वीकारले आणि २०२२ पर्यंत जंगली वाघांची संख्या दुप्पट करण्याचे वचन दिले, ज्याला 'टीएक्स २' असे म्हटले जाते. विशेष म्हणजे भारताने हे उद्धिष्ठ साध्य केले.

५ व्या अखिल भारतीय व्याघ्र गणना २०२२ च्या अहवालानुसार, भारतात किमान ३,१६७ वाघ आहेत, आणि आता जगातल्या एकूण जंगली वाघांपैकी ७०% पेक्षा जास्त वाघ भारतात राहतात. वार्षिक वाढीचा दर ६.१% आहे. २०१० पासून, जागतिक स्तरावर जंगली वाघांची संख्या सुमारे ३,२०० वरून सुमारे ५,५७४ पर्यंत वाढली आहे. भारताने यात महत्त्वाची भूमिका बजावली, कारण भारतातील वाघांची संख्या २०१० मधील १,७०६ वरून २०२२ मध्ये ३,६८२ झाली आहे. यातील महाराष्टात  ४४४ वाघ आहेत.

वाघ केवळ आपल्या सौंदर्याने मन जिंकणारा प्राणी नाही, तर तो जंगलांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या समतोलाचा आधारस्तंभ आहे. त्याला 'जंगलाचा राजा' असेच म्हटले जाते, कारण तो खऱ्या अर्थाने जंगलाचे रक्षण करतो.

वाघ हा अन्नसाखळीतील सर्वोच्च शिकारी आहे. एका वाघाला जगण्यासाठी मोठ्या आणि सुरक्षित अधिवासाची गरज असते. त्यामुळे, जेव्हा आपण वाघांचे संरक्षण करतो, तेव्हा आपण केवळ वाघालाच नव्हे, तर त्याच्या संपूर्ण अधिवासाला म्हणजेच संपूर्ण जंगलाला वाचवतो. वाघाचे जंगल वाचल्यामुळे, त्यात राहणारे इतर अगणित लहान प्राणी, कीटक, पक्षी आणि विविध प्रकारच्या वनस्पतींनाही जीवन मिळते. थोडक्यात, वाघ हे निरोगी आणि समृद्ध पर्यावरणाचे प्रतीक आहे.

जिथे वाघ आहेत, तिथे निश्चितपणे घनदाट जंगल आहे आणि जिथे जंगल आहे, तिथे स्वच्छ हवा, पाणी आणि जैवविविधता आहे. म्हणूनच, वाघांचे संरक्षण करणे म्हणजे पर्यावरणाचे आणि अप्रत्यक्षपणे मानवाचे भविष्य सुरक्षित करणे होय. वाघ म्हणजे केवळ एक प्राणी नाही, तर तो आपल्या निसर्गाचा आणि पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे.

२० व्या शतकाच्या मध्यापर्यंत, शिकार, अधिवास नष्ट होणे आणि मानवी गतिविधींमुळे जगातील वाघांची संख्या तब्बल ९५ टक्क्यांनी घटली होती. भारतात स्वातंत्र्यानंतर, ही घट आणखी वाढली आणि वाघांची संख्या चिंताजनकपणे कमी झाली. १ एप्रिल १९७३ रोजी, भारतात कॉर्बेट टायगर रिझर्व्हमध्ये प्रोजेक्ट टायगर अधिकृतपणे सुरू करण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात नऊ वाघ अभयारण्ये समाविष्ट होती. भारतातील वन्यजीव संवर्धनाचा आधुनिक काळ १९७२ च्या वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या अंमलबजावणीने सुरू झाला. प्रोजेक्ट टायगरने २०२३ मध्ये ५० वर्षे पूर्ण केली.

भारतातील एकूण व्याघ्र अभयारण्यांची संख्या ५४ झाली आहे. ही अभयारण्ये एकत्रितपणे ७८ हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापतात, जे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २.३० टक्के पेक्षा जास्त आहे. मागील वर्षात, भारतातील सहा अतिरिक्त व्याघ्र अभयारण्यांना ती मान्यता मिळाली आहे. प्रोजेक्ट टायगरच्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ कार्यक्रमात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स सुरू केले.

वाघांसोबत सहअस्तित्वाची पातळी भारतात विविध ठिकाणी भिन्न आहे, ज्यावर अर्थव्यवस्था, सामाजिक परिस्थिती आणि सांस्कृतिक घटक परिणाम करतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि कर्नाटकसारख्या राज्यांमध्ये वाघ लोकांसोबत जास्त घनतेने जागा सामायिक करतात. शिकार किंवा अवैध शिकारीचा इतिहास असलेल्या प्रदेशात, जसे की ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्य भारत, वाघ एकतर अनुपस्थित आहेत किंवा नामशेष झाले आहेत. हे क्षेत्र भारताच्या गरीब जिल्ह्यांमध्ये देखील येतात. भारतातील नक्षलवादी संघर्षाने प्रभावित जिल्ह्यांमध्ये, विशेषतः छत्तीसगड आणि झारखंडमधील व्याघ्र अभयारण्यांमध्ये वाघांचे नामशेष होणे दिसून आले आहे. या भागात वाघांचे पुनर्वसन करून आणि संरक्षित क्षेत्रांमधील अधिवासाची जोडणी वाढवून वाघांना पुन्हा आणता येऊ शकते.

पर्यावरणातील जबाबदार घटक म्हणून आपण वाघांची शिकार थांबवून, त्यांच्या नैसर्गिक घरांचा आदर करायलाच पाहिजे. कचरा न फेकता आणि जंगलात शांतता राखून त्यांना सुरक्षित ठेवूया. वाघांचे महत्त्व इतरांना सांगून, जनजागृतीचा भाग होऊया.

शासनाच्या प्रयत्नांना साथ देत, वाघांना वाचवण्यासाठी हातभार लावूया.
 
✍️ सचिन अडसूळ,
 जिल्हा माहिती अधिकारी,
 कोल्हापूर

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes