पन्हाळा : बांदिवडेचे अश्नीस्तंभ - निसर्गाचा एक दुर्लक्षित अद्भुत चमत्कार...
schedule16 Dec 24 person by visibility 986 categoryसामाजिक

भटकंती परिवाराने आयोजित केलेल्या, हेरिटेज वॉक मध्ये, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील शेवटचे टोक व मसाई पठाराच्या पश्चिम उत्तर दिशेला असलेले अतिप्राचीन परंतु प्रचंड दुर्लक्षित असे अश्नीस्तंभ. त्याला उतरंड किंवा कौआरी असेही म्हटले जाते, येथे जाण्याचा योग आला.
हे एक असे ठिकाण जे कोल्हापूर पासून अवघ्या तीस-पस्तीस किलोमीटरवर कौअरखिंड परिसरात आहे. आपल्या व्यस्त दैनंदिन जीवनातून वेळ काढून असे निसर्गाच्या सानिध्यात असलेले अद्भुत व वैशिष्ट्यपूर्ण निसर्गनिर्मित बांदिवडेचे अश्नीस्तंभ, हा निसर्गाचा चमत्कार जरूर पाहण्यासारखा आहे.
आम्हाला स्थानिक लोकांनीही सांगितले की, अशी आख्यायिका आहे की, त्या ठिकाणी एका साधूच्या शापाने अख्खे लग्नाचे वऱ्हाड गुप्त झाले होते. कौआरी (कुवारी) देवी या नावाने अश्नीस्तंभाच्या पायथ्याशी जागृत देवस्थान (मंदिर) आहे... या परिसराला कौअरखिंड असे म्हणतात...
ॲड. प्रसन्न मालेकर यांनी सांगितले की, हवामान आणि भूगर्भीय हालचालींमुळे माती आणि इतर गोष्टींची धूप होऊन हे अद्भुत नैसर्गिक असे अश्नीस्तंभ तयार झाले आहेत. म्हणजेच भल्या मोठे दगड एकमेकांवर नैसर्गिकरीत्या रचले जाऊन दगडांचे उंचच उंच असे दगडी खांब बनलेले आहेत.
साधारण 60 लाख 56 हजार वर्षांपूर्वी पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरमाळ अस्तित्वात आलेली असावी असा अंदाज आहे... भूशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पन्हाळा साईट खूप महत्त्वाची आहे.
मसाई पठार हे कोल्हापूरकरांच्या परिचयाचे आहे. परंतु मसाई पठारच्या शेवटच्या टोकापर्यंत जर तुम्ही कधी गेलात, तर तुम्हालाही सुंदर अशी दगडांची रचना दिसून येईल... इथे शेकडो दगडांचे विविध दगडी खांब पहायला मिळतात. दहा ते बारा किंवा त्या पेक्षा जास्त दगड एका खांबात भक्कमपणे उभे असलेले दिसून येतील. अगदी कोरून एकमेकांवर रचल्याप्रमाणे हे दगडांचे खांब तयार झाले आहेत. ही सर्वात तरुण डोंगर रांगांपैकी एक अशी दगडांची उतरंड आहे.
एका रांगेतील दोन पठारांना जोडणाऱ्या चिंचोळ्या नाळीवर दगडांची अद्भुत अशी रचना आहे. यामध्ये एका खांबामध्ये एका ठिकाणी साधारण चार फूट उंचीचा दगड फुटून नैसर्गिकरीत्या वेगळा झालेला आहे. त्यातून आरपार सुंदर अशी खिडकी तयार झालेली आहे. याच उतरंडीतील दगडांपैकी एक दगड अशा रीतीने उभा आहे, की तिथे पोकळी तयार झाल्याने त्या दगडावर वाजवून पाहिल्यावर वेगवेगळे अद्भुत्व व चमत्कारिक असे आवाज ऐकू येतात.
कोल्हापूर पासून पन्हाळा रोडने, बुधवार पेठ (पन्हाळा पावनखिंड चा जो मार्ग आहे त्या मार्गाने) जेऊर मार्गे कुंभारवाडी च्या पुढे आणि खोतवाडी च्या एक किलोमीटर अलीकडे डाव्या बाजूला बांदिवडेचे अश्निस्तंभ दिसून येतात... हे अंतर कोल्हापूर पासून अंदाजे 30-35 किलोमीटरवर आहे.
दुसरा मार्ग म्हणजे वाघबीळ वरुन संजीवनी स्कूल कडून राक्षी मार्गे इंजोळेच्या पुढे बांदिवडे ला जाता येते, हे अंतर ८ ते ९ किलोमीटरवर आहे. बांदिवडेच्या अलीकडे उजव्या बाजूला हे अश्नीस्तंभ दिसून येतात.
तसेच तिसरा मार्ग उत्तर पुर्वेकडील बाजूने मलकापूर मार्गे जाणार असाल तर आंबवडे मधून वर खोतवाडी पर्यंत जावे. तिथून एक किलोमीटरवर उजव्या बाजूस ही आश्र्नीस्तंभाची उतरंड नजरेस पडते.
पन्हाळ्याचे दुर्लक्षित आसणारे हे अश्नीस्तंभ आता जागतिक वारसास्थळात नोंद होत असलेने पन्हाळ्याचे नांव आणखीनच उंचावले आहे. या ठिकाणी तुम्ही जरूर भेट द्या .या हेरिटेज वॉकचे आयोजन भटकंती ग्रुपचे वैभव कुलकर्णी व अभिजीत कुलकर्णी यांनी केले होते.
✍️ डॉ. देवेंद्र रासकर, कोल्हापूर.
