बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
schedule21 Apr 25 person by visibility 262 categoryगुन्हे

मुंबई : सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची २०१६ मध्ये हत्या झाली होती. याबाबत पनवेल सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती याप्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजारांचा दंडही सुनावण्यात आला आहे. तर या प्रकरणातील इतर दोन आरोपी म्हणजेच कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या दोन आरोपींना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ९ वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे.
बहुचर्चित पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे अपहरण आणि हत्या प्रकरणात बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी असल्याचंच समोर आले. तर महेश फळणीकर आणि कुंदनलाल भंडारी यांना पुरावा नष्ट केल्याप्रकरणी दोषी जाहीर करण्यात आले. मात्र याप्रकरणातील दोन क्रमांकाचा आरोपी ज्ञानदेव उर्फ राजू पाटील याला पुराव्या अभावी निर्दोष सोडण्यात आले.
अश्विनी बिद्रे यांची २०१५ मध्ये नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र त्या कळंबोली पोलीस ठाण्यात रुजू झाल्याच नव्हत्या. दीड वर्षांपासून त्या बेपत्ता होत्या. अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी कळंबोली पोलीस ठाण्यात अभय कुरुंदकर यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले होते.
११ एप्रिल २०१६ रोजी अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्याची बाब उघड झाली. अनैतिक प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आली. या प्रकरणात भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर मुख्य आरोपी होता. अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. या याप्रकरणी अभय कुरुंदकर, ज्ञानदेव पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना अटक करण्यात आली. दरम्यान पनवेल सत्र न्यायालयाने आज निकाल दिला आहे .