घनपाठी, शर्मा, देशपांडे, निगुडकर, प्रकाश गवंडी शंकराचार्य पीठाचे मानकरी; सात ते बारा मे जयंती उत्सव
schedule06 May 25 person by visibility 249 categoryसामाजिक

कोल्हापूर : येथील श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर पीठाचा जयंती उत्सव येत्या सात ते बारा मे या कालावधीत रोजी आयोजित केल्याची माहिती विद्यानृसिंह भारती यांनी दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले, श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या २५३३ व्या जयंती उत्सवा निमित्ताने पीठामध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये जन्मकाळ, कीर्तन, रामायण, हवन, भाव भक्तिगीते अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन तर दररोज होईलच याशिवाय देवतांना अभिषेक, गीताभाष्य, दशोपनिषद वाचन याचे आयोजन केले आहे. स्वामीजी म्हणाले, पीठाचा महत्त्वाचा कार्यक्रम असणारा पुरस्कार वितरण ११ मे रोजी आयोजित केला आहे.
या पुरस्काराचे वैदिक पुरस्कार ईश्वर घनपाठी (वाराणसी), सांस्कृतिक पुरस्कार दोर्बल शर्मा (हैदराबाद), कीर्तनकार पुरस्कार राघवेंद्र देशपांडे (धाराशीव), स्थानिक वैदिक पुरस्कार प्रसाद निगुडकर (कोल्हापूर), सामाजिक गौरव प्रकाश आनंदराव गवंडी (कोल्हापूर), डॉ. साळवे (पुणे), महिला कीर्तनकार पुरस्कार मानसी बडवे (पुणे), होतकरू विद्यार्थी पुरस्कार यज्ञानंदन कस्तुरे (जालना), वेदार्थ जोशी (आळंदी), उत्कृष्ट शासकीय कर्मचारी पुरस्कार सौ. वैभवी अभय दाबके (मुंबई) असे मानकरी आहेत. पीठामध्ये सकाळी दहा वाजता पुरस्काराचे वितरण होईल. यावेळी संभाजी भिडे मार्गदर्शन करतील. १२ मे रोजी पीठाची पालखी करवीर निवासिनी अंबाबाईच्या भेटीला जाईल. शहराच्या प्रमुख मार्गावरून जाऊन ती पुन्हा पीठात येईल. त्या अगोदर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
महाप्रसाद व इतर कार्यक्रमांचा भक्तगणांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामींनी यावेळी केले. कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.