इचलकरंजी, जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाईपोटी पाच वर्षांत अनुक्रमे ६५७ कोटी, ३९२ कोटी मिळणार
schedule27 May 25 person by visibility 249 categoryराज्य

मुंबई : इचलकरंजी आणि जालना या नव्याने निर्माण करण्यात आलेल्या महानगरपालिकांना वस्तू व सेवाकर भरपाईपोटी अनुदान देण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
यानिर्णयामुळे पुढील पाच वर्षात इचलकरंजी महानगरपालिकेस 657 कोटी व जालना महानगरपालिकेस 392 कोटी रूपयांचा निधी प्राप्त होईल.
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (स्थानिक प्राधिकरणांना भरपाई देण्याबाबत) अधिनियम, 2017 नुसार इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेचा कलम 9 मधील परिशिष्टामध्ये समावेश करण्यासाठी मान्यता देण्यात आली. याच अधिनियमाच्या कलम 5 मध्ये असलेल्या तरतुदीनुसार दोन्ही महानगरपालिकांसाठी आधारभूत वर्ष म्हणून सन 2024-25 निश्चित करण्यात आले. यानुसार पुढील पाच वर्षात दोन्ही महानगरपालिकांना इचलकरंजी महानगरपालिकेस 657 कोटी व जालना महानगरपालिकेस 392 कोटी रूपयांचा एकूण 1 हजार 049 कोटी रुपये देण्यात येणार आहेत