अग्निशमन विभागाच्या मिनी रेस्क्यू टेंडर (गुरखा) वाहनाचा लोकार्पण
schedule01 May 25 person by visibility 246 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग (आपत्ती व्यवस्थापन , मदत व पुर्नवसन ) विभागाकडुन 88 वाहने विविध महानगरपालिका व इतर नगरपरिषदेकरीता उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यापैकी 1 मिनी रेस्क्यू टेंडर (गुरखा) वाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागास देण्यात आले आहे. या वाहनाचा लोकार्पण आज पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम शाहू स्टेडियम येथे घेण्यात आला.
यावेळी जैन अल्पसंख्याक वित्तीय विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, स्थानक अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, ओंकार खेडकर व अग्निशमन विभागाचे जवान उपस्थित होते.
ड वर्ग महानगरपालिका व अ, ब वर्ग नगरपरिषदा यांना अग्निशमन यंत्रणेसाठी 109 मिनी रेस्क्यू टेंडर हे अत्याधुनिक वाहन उपलब्ध करुन देणेबाबत महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक यांच्याकडुन शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेस हे वाहन उपलब्ध झाले आहे. हे मिनी रेस्क्यू टेंडर (गुरखा) वाहन फोर्स कंपनीच्या गुरखा या वाहनावर बांधण्यात आले आहे. या वाहनामध्ये 300 लि. पाणी व 10 लि. फोम ची क्षमता आहे. तसेच अग्निशमन व आपत्कालीन कालावधीसाठी अत्याधुनिक रेस्क्यु टुल्स, हायमास्ट, कटर, जॅक, स्ट्रेचर, फायर एक्स, टॉर्च, लाईफ जॅकेट, इत्यादी साहित्य या वाहनावर उपलब्ध असणार आहे. या वाहनाचा उपयोग अरुंद बोळ, गल्ली, पेठ, जेथे मोठे अग्निशमन वाहन पोहचणार नाही याठिकाणी करता येणार आहे.