कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद कक्ष (ERSU) स्थापन; विशेष वाहनाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
schedule26 Jun 26 person by visibility 97 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : मलवाहिन्या व मलसंकलन केंद्राच्या (Sewer व Septic Tank) स्वच्छते दरम्यान कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी आपत्कालीन स्वच्छता प्रतिसाद कक्ष (Emergency Response Sanitation Unit ERSU) स्थापन करण्यात आला असून, त्यासाठीचे अत्याधुनिक विशेष वाहन कोल्हापूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. या वाहनाचे लोकार्पण आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले.
यावेळी महापौर सौ. रुपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅस्मिन, उप-महापौर अक्षय जरग, महिला बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवाण, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, सहा.आयुक्त विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रनभिसे, नगरपालिका प्रशासन अधिकारी देवानंद ढेकळे, नगरसेवक अश्किन आजरेकर, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मलवाहिन्या व मल संकलन केंद्राच्या स्वच्छते दरम्यान उद्भवणाऱ्या आणीबाणीच्या प्रसंगी तातडीने आणि सुरक्षित प्रतिसाद देण्यासाठी ERSU कक्ष कार्यान्वित करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांनी नगरपालिका प्रशासन शाखा, कोल्हापूर यांनी हे विशेष वाहन उपलब्ध करून दिले आहे. वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे म्हणजेच कोल्हापूर महानगरपालिकेकडे हे वाहन हस्तांतरित करण्यात आले आहे.
हे अत्याधुनिक ERSU वाहन विविध सुरक्षा व बचाव उपकरणांनी सुसज्ज आहे. यामध्ये गॅस डिटेक्टर, विषारी वायू बाहेर काढण्यासाठी एक्झॉस्ट फॅन, मेटल डिटेक्टर, सुमारे 50 मीटर अंतरापर्यंत शोध घेणारी कॅमेरा प्रणाली, ड्रेनेज लाईनमध्ये उतरण्यासाठी विविध प्रकारच्या शिड्या, अंधारात काम करण्यासाठी फोकस लाइटिंग सिस्टीम तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वर खेचण्यासाठी स्वयंचलित (ऑटोमॅटिक) रेस्क्यू सिस्टीमचा समावेश आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत ERSU कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे मलनिःस्सारण व्यवस्थेची देखभाल व दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक सुरक्षा साधने, आवश्यक उपकरणे व प्रशिक्षण उपलब्ध होणार असून, त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यास तसेच स्वच्छतेच्या कामादरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे.