डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे बेड वेटींग मार्गदर्शन शिबिर संपन्न
schedule27 May 25 person by visibility 267 categoryआरोग्य

कोल्हापूर : ‘जागतिक बेड वेटिंग डे’ निमित्त डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे मंगळवारी मुलांमधील अंथरूण ओले करण्याच्या समस्येबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. शंभरहून अधिक मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
मे महिन्याच्या शेवटच्या मंगळवार हा जागतिक बेड वेटिंग दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. कदमवाडीतील डी.वाय.पाटील हॉस्पिटल येथे बालरोग विभाग व मूत्ररोग विभागाच्यावतीने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बी. नेर्ली म्हणाले, मुल झोपेत असताना अनवधानाने अंथरूण ओले करण्याची समस्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यत सामान्य समस्या आहे. वैद्यकीय भाषेत याला नॉक्टर्नल एन्युरेसिस असे म्हणतात. झोपेत असताना मुलांचे मूत्राशयावर नियंत्रण नसते. पाच वर्षानंतर सुद्धा अशी समस्या मुलांमध्ये असेल तर या समस्येचं रूपांतर मानसिक समस्येत होते. याच्यावर योग्य उपचार होणं गरजेचं आहे. या समस्येविषयी वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.
यावेळी उपस्थित मुलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या पालकांना योग्य तो सल्ला देण्यात आला. या समस्ये मध्ये पालकांनी घाबरून न जाता ही समस्या समजून घेऊन, मुलांशी मोकळेपणी बोलावे. तसेच वैदयकीय अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बी. नेर्ली यांनी केले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. राजश्री माने, बालरोग तज्ज्ञ डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. देवयानी कुलकर्णी, डॉ. रमेश निगडे, साईप्रसाद कवठेकर, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, सौरभ पाटील, यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी पालक व मुले उपस्थित होते.