भाजपा कोल्हापूर महानगर मंडल अध्यक्षांच्या निवडी जाहीर...
schedule21 Apr 25 person by visibility 557 categoryराजकीय

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण १२२१ मंडल स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ९६३ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. "संघटन हेच खरे बळ" या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.
याच धर्तीवर आज संघटन पर्व अभियाना अंतर्गत भाजपा कोल्हापूर महानगरच्या ९ मंडल अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाच्यावतीने या मंडल अध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली. भाजपा कोल्हापूर महानगर म्हणून उत्तर विधानसभा पूर्ण तर दक्षिण विधानसभेतील एकूण १८६ बूथ यामध्ये समाविष्ट होतात. उत्तर विधानसभेत ६ तर दक्षिण विधानसभेच्या ३ अशा एकूण ९ मंडलांचा समावेश आहे. प्रत्येक मंडलात बैठक घेऊन आज मंडल अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी पक्षातील प्रमुख पदाधिका-यांनी ही जबाबदारी पार पाडली यासाठी त्यांना प्रवासी नेते भरत पाटील (सातारा), जिल्हा निवडणूक अधिकारी आमदार अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
