वक्फ कायद्यात झालेली दुरुस्ती म्हणजे केंद्र सरकारचा क्रांतिकारक, ऐतिहासिक निर्णय : खासदार धनंजय महाडिक
schedule25 Apr 25 person by visibility 373 categoryराजकीय

कोल्हापूर : आजवर देशात वक्फ कायद्याची चुकीच्या पध्दतीने अंमलबजावणी झाली. हा कायदा म्हणजे काँग्रेस सरकारचे षडयंत्र होते. त्यातून एका विशिष्ट समाजाला मालमत्ता आणि मिळकती संदर्भात अमर्याद अधिकार आणि सत्ता मिळाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्फकायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दलंचं विधेयक संसदेत गेल्या आठवडयात स्पष्ट बहुमतानं मंजूर झालं. देशाच्या दृष्टीनं हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय आहे, असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. सकल हिंदू समाजाच्या वतीनं झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
केंद्र सरकारचं उन्हाळी अधिवेशन नुकतंच पार पडलं. त्यामध्ये वक्फ कायद्यात दुरुस्ती करणारं विधेयक संसदेनं मंजूर केलं. या विधेयकाबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी अभ्यासपूर्ण भाषण केलं होतं. तसंच हिंदू धर्मियांच्या हितरक्षणाची भूमिका घेतल्याबद्दल, सकल हिंदू समाजाच्या वतीनं, आज खासदार धनंजय महाडिक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सुवासिनींकडून औक्षण करून, फुलांच्या पायघड्या घालून, मिरवणूक काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शाल, श्रीफळ देऊन खासदार महाडिक यांचा सत्कार केला. तर खासदार धनंजय महाडिक यांच्यासह सर्व मान्यवरांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं.
प्रारंभी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या पर्यटकांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी दीपक पाटील यांनी खासदार महाडिक यांच्या सत्कारामागील भूमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गेल्या दहा वर्षात जी प्रमुख विधेयकं संसदेत मंजूर झाली, त्यामध्ये भाषण आणि मतदान करण्याचं भाग्य मिळालं, असं खासदार महाडिक यांनी आवर्जून नमूद केलं. देशातील हिंदूंच्या मिळकती आणि मालमत्तांचं संरक्षण करणं, हाच या विधेयकाचा हेतू आहे. हे विधेयक कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही. पण एका विशिष्ट समाजाला देण्यात आलेले अमर्याद अधिकार आणि सत्ता नियंत्रित करण्यासाठीच, केंद्र सरकारनं विधेयकात दुरूस्ती केली. या विधेयकाला मुस्लिम समाजाच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असलं, तरी ही न्यायालयीन लढाई सुद्धा केंद्र सरकार जिंकेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला.
यावेळी रणजित पाटील-चुयेकर, संजय वास्कर, महेश पाटील, किरण घाटगे, राहुल पाटील, अवधूत कोळी, हातगोंड पाटील, बाबुराव कोळी, प्रताप पाटील-कावणेकर, राजू माने, विजय माने, युवराज वाडकर, पोपट बेडगे, गजानन पाटील, प्रताप मगदुम यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.