तंबाखूमुक्त शाळांसाठी करवीर तालुक्यात मुख्याध्यापक कार्यशाळा उत्साहात
schedule30 Jun 25 person by visibility 164 categoryसामाजिक

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या सर्व व इतर व्यवस्थापनाच्या शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांची कार्यशाळा मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात संपन्न झाली.
या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम (NTCP), जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमात शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. मीना शेंडकर यांनी भावी पिढी व्यसनमुक्त राहणे ही काळाची गरज आहे, असे स्पष्ट करत तंबाखूमुक्ततेचे महत्व अधोरेखित केले. जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी कोटपा कायदा 2003, तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम, तसेच 200 रुपयांपर्यंतच्या दंडात्मक कारवाईसंदर्भातील माहिती दिली. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा तंबाखूमुक्त करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम यांनी उपस्थित शिक्षकांना तंबाखू मुक्तीची शपथ दिली. यावेळी एकनाथ कुंभार व संजय ठाणगे यांनी सादरीकरणाद्वारे तंबाखूमुक्त शाळांसाठी आवश्यक निकषांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेला करवीर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.