प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून विमान दुर्घटनेची गंभीर दखल; अहमदाबादच्या विमान दुर्घटनेतील मृत प्रवाशांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली
schedule12 Jun 25 person by visibility 250 categoryदेश

▪️अकोला दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत मृत प्रवाशांना श्रद्धांजली
मुंबई : गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरुन लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळून झालेल्या अपघातात प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू धक्कादायक, क्लेशदायक, दुर्दैवी घटना असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. अहमदाबाद शहरातील या विमान अपघातामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश आज दु:खी असून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रत्येक महाराष्ट्रवासी सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात पुढे म्हणतात की, अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर थोड्याच वेळेत अहमदाबाद शहरातील इमारतींवर कोसळलं. ती संपूर्ण दुर्घटना धक्कादायक, क्लेशदायक होती. गुजरात पोलिस, अग्निशमन, अॅम्ब्युलन्स सेवा, वैद्यकीय पथकांनी, सुरक्षादलांनी दुर्घटनास्थळी पोहचून तातडीने बचाव व मदतकार्य राबवलं. परंतु झालेली जीवितहानी खूप मोठी असून ती भरुन निघणार नाही. अपघाताचं निश्चित कारण अद्याप कळलं नसलं तरी चौकशीअंती ते स्पष्ट होईल. परंतु अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमान दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातला पाठवले आहे. या दुर्घटनेच्या निमित्तानं विमानसेवेच्या सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. विमानसेवा कंपन्यांनी त्यांच्या विमानसेवेच्या सुरक्षेचा फेरआढावा घेऊन, सुरक्षितता मानकांचे पालन करुन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही, हे सुनिश्चित करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, अकोला, बुलडाणा दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कार्यक्रम साध्या पद्धतीने घेत दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.