उदारमतवादी, विज्ञानवादी, सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा पुरस्कार करणारे लोकशाहीवादी पंतप्रधान: पंडित जवाहरलाल नेहरू
schedule27 May 25 person by visibility 365 categoryदेश

२७ मे: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्ताने...
पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ सेवा देणारे लोकप्रिय पंतप्रधान होत. त्यांच्या दूरदृष्टीचे प्रत्यंतर सर्व भारतीयांना आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या प्रदीर्घ लढ्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे, त्यासाठी त्यांनी अनेकदा तुरूंगवास भोगला. राष्ट्र उभारणीवर त्यांचा दृढ निश्चय व निर्धार होता. आपल्या देशाच्या विकासासाठी ते अहोरात्र झटले.
परदेशात शिक्षण घेत त्यांनी बॅरिस्टर ही पदवी संपादन केली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधींचे ते अगदी जवळचे विश्वासू सहकारी होते. स्वातंत्र्योत्तर भारतात विविध शैक्षणिक संस्था, पोलाद प्रकल्प आणि धरणांची उभारणी करून त्यांनी भारताच्या व्यापक विकासाची मुहूर्तमेढ रोवली. आज देशाला सर्व क्षेत्रात जी स्वायत्तता व आत्मनिर्भरता प्राप्त झाली आहे, त्याचे सर्व श्रेय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे जाते.
पंडित नेहरूंनी आपल्या संपूर्ण आयुष्यात धर्मनिरपेक्षता या मुल्यांची पाठराखण केली, त्यामुळेच धर्मनिरपेक्षता या विचाराला भारतीय संविधानाचा एक मुलभूत स्तंभ बनवला. भारतात कोणत्याही एका धर्माचे प्राबल्य नसावे, पण प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचे, प्रचार करण्याचे आणि आचरण करण्याचे अधिकार असावेत , यासाठी ते आग्रही होते, या त्यांच्या आग्रहाचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे. कोणत्याही धर्माला राज्याचे अधिकृत समर्थन करता येणार नाही, ही नेहरूंची आग्रही भूमिका होती. नेहरूंनी हिंदू समाजातील महिलांना समानता मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले हिंदू कोड बिल मंजूर केले . महिलांना संपत्तीतील हक्क, घटस्फोटाचा अधिकार, आणि पुनर्विवाहाची संधी देणाऱ्या या कायद्याला नेहरूंनी सक्रियपणे पाठिंबा दिला. या कायद्याला विरोध करणाऱ्या रूढीवादी, सनातनी व कर्मठ विचारांच्या गटांना समर्थपणे तोंड देऊन त्यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी मोठे पाऊल उचलले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगलीं झाल्या, या दंगलीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नेहरूंनी कठोर पावले उचलली. दिल्लीतील धार्मिक दंगलींमध्ये हस्तक्षेप करून फाळणीच्या वेळी झालेल्या दंगलीत त्यांनी स्वतः दिल्लीत फिरून लोकांना शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले. नेहरूंनी विभाजनामुळे विस्थापित झालेल्या हिंदू आणि मुस्लिम, दोघांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले. विभाजनानंतरच्या शरणार्थी शिबिरांमध्ये नेहरूंनी हिंदू आणि मुस्लिम, दोघांना समान मदत मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले. कारण कोणत्याही धर्माचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे असे ते मानत होते. त्याच वेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी धार्मिक तणाव कायम होता तरीही नेहरूंनी पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी काश्मीरला भारताचा भाग ठेवतानाही मुस्लिमबहुल समाजाच्या हितांचे रक्षण केले. त्यांनी भारतातील मुस्लिम नागरिकांवर विश्वास ठेवून त्यांना भारताच्या राजकीय प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले.
त्यामुळे तत्कालीन विरोधकांनी त्यांच्यावर मुस्लिमधार्जिणे असल्याचा आरोप केला, तरीही नेहरूंनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि इतर मुस्लिम शिक्षण संस्थांना मदत व प्रोत्साहन दिले. मुस्लिम समाजात शिक्षणाची गती वाढावी यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. शिक्षण क्षेत्रातील अशा योगदानातून ते सर्व समाजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. नेहरूंनी भारतात धर्मनिरपेक्ष शिक्षण प्रणालीचा पाया रचला. विज्ञानवादी दृष्टिकोन आणि सर्वधर्मसमभाव वाढावा यासाठी प्रयत्न केले. धर्मनिरपेक्ष शिक्षणावर भर दिला. तसेच सार्वजनिक शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक शिक्षणाला थारा दिला नाही.
पंडित नेहरूंवर राजकीय दृष्टिकोनातून गोवधबंदी करावी यासाठी दबाव होता, तरी नेहरूंनी गोवधबंदीला कडाडून विरोध केला. कारण त्यांच्या मते, गोवधबंदी हा धार्मिक विषय होता. भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याने गोवधबंदीने राज्याच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे त्यांचे मत होते. गोवधबंदीचा विचार हिंदूंच्या धार्मिक भावनांशी संबंधित असल्याने त्यांनी त्याला धर्मनिरपेक्ष धोरणांचा भाग होऊ दिले नाही. त्याच वेळी सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रश्न धार्मिकदृष्ट्या संवेदनशील होता म्हणून नेहरूंनी स्पष्ट केले की, ही प्रक्रिया सरकारने नव्हे, तर खासगी निधीतून व्हायला हवी. त्यांनी धर्माचा राजकारणात उपयोग होऊ नये यासाठी अशी भूमिका घेतली होती. कारण संविधानानुसार भारत देश हा धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे सरकारने कोणत्याच धर्मात ढवळाढवळ करता कामा नये, असे नेहरू मानत होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंची पहिली वचनबद्धता भारताला स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था बनवण्याची होती. परिणामी, त्यांनी आधुनिक शिक्षणाची मंदिरे आणि विशाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची स्थापना केली जी वाढत्या राष्ट्राच्या आणि तेथील लोकांच्या गरजा पूर्ण करतात. उच्च शिक्षण केंद्रे स्थापन करण्याच्या त्यांच्या आवेशातून वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. अनेक भारतीयांचा असा विश्वास आहे की भारत एक दोलायमान लोकशाही, एक औद्योगिक शक्तीगृह, एक ज्ञान भागीदार, जागतिक स्तरावर प्रतिष्ठित लष्करी शक्ती आणि तंत्रज्ञान आणि अंतराळातील नवोन्मेषक, याचे श्रेय पंडित नेहरूंना गेले पाहिजे; त्यांचे कारण असे की,त्यांनी देशाचा मजबूत पाया घातला होता. ते देशातील मुलांना 'भावी नागरिक' म्हणून प्रेरित करतात. मुलांनी त्यांना "चाचा नेहरू" म्हणून गौरविले, म्हणूनच त्यांचा १४ नोव्हेंबर हा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो.
ते उदारमतवादी आणि मनाने खरे लोकशाहीवादी होते, आज काॅंग्रेसविरोधी शक्ती विविध मार्गांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्याबाबतीत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, विशेष म्हणजे देशाप्रती असणारे त्यांचे निस्सीम प्रेम, अद्वितीय त्याग तसेच देश विकासाचा घेतलेल्या ध्यास व त्यासाठी केलेली प्रयत्नाची पराकाष्ठा, शिवाय असिम दूरदृष्टी याचा देशपरदेशात गौरव होत असतांनाही काही विघातक शक्ती त्यांच्या या कार्याचा पध्दतशीर विसर पडावा म्हणून त्यांच्यावर निराधार बेछूट आरोप करत आहेत, हे बिलकूल चुकीचे आहे, तथापि ज्यांनी त्यांच्या जीवनचरित्राचा व महान कार्याचा अभ्यास केला आहे, अशा समाजशास्त्राच्या अभ्यासकांना नेहरूविरोधक किती खोट्या, निराधार व खालच्या पातळीवर जाऊन असंस्कृतपणे टिका करतात हे समजून येते. अर्थात भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे धिरोदात्त कर्तृत्व, देशासाठी केलेला त्याग व देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात टाचणी सुध्दा बनत नव्हती, व अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण नव्हतो,अशा १७ वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात केलेला देशाचा अद्वितीय व आमुलाग्र विकास कोणीही विसरू शकत नाही. आपली करोडो रुपयांची संपत्ती देशाला दान करून नेहरूंनी देशाप्रती प्रेम, त्याग,निष्ठा व दातृत्व या गुणांचा प्रत्यक्ष प्रत्यय आणून दिला आहे.
✍️ डॉ सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)