कागल तालुक्यात गोबरगॅसच्या खड्डयात पडून दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
schedule17 Jun 25 person by visibility 351 categoryगुन्हे

कोल्हापूर : घराच्या मागील बाजूस असलेल्या गोबरगॅसच्या खड्यात पडून दीड वर्षाच्या स्वरा पंकज पाटील या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.१७) कागल तालुक्यातील केनवडे येथे सकाळी घडली.
घरामध्ये स्वरा दिसत नसल्याने पंकज यांनी घरातील सदस्यांना विचारले असता त्यांनी ती आजोबांसोबत बाहेर गेली असल्याचे सांगितले. मात्र, आजोबा घरी आल्यानंतर ती सोबत नसल्याचे सांगितल्यावर घरातील लोकांची तिचा परिसरात शोध घेतला असता ती खड्यातील पाण्यात तरंगताना दिसून आली. तिला तत्काळ पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्वरा घराच्या अंगणात खेळत होती. खेळत खेळत ती घराच्या मागील बाजूस असणाऱ्या गोबरगॅसच्या खड्डयाजवळ गेली आणि त्यात पडली. या हृदयद्रावक घटनेने केनवडे गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.