कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्यासाठी केंद्रस्तरावर प्रयत्न व्हावेत, खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची भेट
schedule30 Jun 25 person by visibility 184 categoryदेश

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी इटली मधील एका फॅशन शोमध्ये जगप्रसिद्ध प्राडा कंपनीकडून कोल्हापुरी चप्पलचा वापर झाला होता. मात्र व्यापारी नियमानुसार त्या चप्पलला कोल्हापूरचे ब्रॅण्डिंग मिळाले नव्हते. त्यानंतर युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दरम्यान इटलीतील प्राडा कंपनीने त्या चप्पलचे डिझाईन, कोल्हापुरी चप्पलचे असल्याचे मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर प्राडा कंपनीने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सशी संपर्क साधून, चर्चेला तयार आहे, असेही कळवले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री नामदार पियुष गोयल यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
कोल्हापुरी चप्पल ही स्थानिक कारागिरांची ओळख आणि पूर्वापार व्यवसाय आहे. कोल्हापूरची हस्तकला, ग्रामीण संस्कृती आणि समृद्ध परंपरा दर्शवणाऱ्या कोल्हापुरी चप्पलला, प्राडा सारख्या जगप्रसिद्ध कंपनीने, फॅशन शो च्या मंचावर आणले ही अभिमानाची बाब आहे. आणि आता संबंधित डिझाईन कोल्हापुरी असल्याचे त्या कंपनीने मान्य केले आहे. त्यामुळे तातडीने केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने लक्ष घालून, वेळप्रसंगी हस्तक्षेप करून, कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी आणि व्यापार वृध्दी साठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली आहे.
प्राडा कंपनीने फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचे प्रदर्शन केले, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. आता या कंपनीने संबंधित चप्पलच्या डिझाईनवर, कोल्हापुरी लेदर फुटवेअर असा नामोल्लेख करावा, जेणेकरून कोल्हापुरी चप्पलचा नावलौकिक वाढेल, अशी भूमिका खासदार धनंजय महाडिक यांनी मांडली. तसेच प्राडा कंपनीने मागणी केल्यास, कोल्हापूरचे चर्मकार कारागीर आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी चप्पलची निर्मिती करून देऊ शकतील, कारण प्राडासारख्या जगविख्यात कंपनीने कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली, तर जगभरातील अनेक नामांकित फॅशन डिझायनर आणि पादत्राण उत्पादक कंपन्या सुद्धा कोल्हापुरी चप्पलची मागणी करतील आणि त्यातून कोल्हापुरी चप्पल निर्मिती करणाऱ्या कारागिरांना चांगले दिवस येतील, अशी भावना खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.
इटलीतील फॅशन शोमध्ये प्राडाने कोल्हापुरी चप्पलला एक प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून दिले आहे. आता कोल्हापुरी लेदर फुटवेअर म्हणून जगभर कोल्हापुरी चप्पलची महती पोहोचावी, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांकडे केली आहे.